Asian Games 2023 India Medals: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंकडून दमदार कामगिरी सुरु आहे. भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत 81 पदकांची कमाई केली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासातील ही भारताची सर्वोत्तम कामगिरी आहे. जकार्ता येथील स्पर्धेचा विक्रम भारताने मोडीत काढला आहे. जकार्ता येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने 70 पदके पटकावली होती. आतापर्यंत भारताने 81 पदकावर नाव कोरले आहे. यामध्ये 18 सुवर्ण, 31 रौप्य आणि 32 कांस्य पदकांचा समावेश आहे. भारत यंदा आशियाई क्रीडा स्पर्धेत 100 पदकांची संख्या पार करण्याची शक्यता आहे.
आज तीन सुवर्णपदकांची कमाई -
आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताने 3 सुवर्ण पदकांव्यतिरिक्त 5 रौप्य पदके आणि 4 कांस्य पदके जिंकली. त्यामुळे भारताच्या पदकांची संख्या 81 झाली आहे. 18 सुवर्ण पदकांव्यतिरिक्त भारताने 31 रौप्य पदके आणि 32 कांस्य पदके जिंकली आहेत. मात्र, पदकतालिकेत भारत चौथ्या स्थानावर कायम आहे. चीन 167 सुवर्ण पदकांसह एकूण 310 पदकांसह अव्वल स्थानावर आहे. तर जपान 37 सुवर्णपदकांसह 147 पदके जिंकत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
4*400 मीटरमध्ये सुवर्ण -
पुरुषांच्या 4*400 मीटरमध्ये भारताला सुवर्णपदक मिळाले आहे. मुहम्मद अनस, अमोज, मुहम्मद अजमल आणि राजेश यांनी भारतासाठी सुवर्णपदक जिंकले आहेत. आतापर्यंत भारताने 18 सुवर्णपदके जिंकली आहेत.
नीरज चोप्राने सुवर्ण तर किशोरने रौप्य, भालाफेकीत भारताची दमदार कामगिरी
भारताचा आघाडीचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने पुन्हा एकदा दमदार कामगिरी करत गोल्ड मिळवले आहे. भालाफेकीत नीरज चोप्रा याने शानदार कामगिरी केली. नीरज चोप्राशिवाय भारताचा किशोर जेना यानेही दमदार परफॉर्म केला. रौप्य पदक पटकावत किशोर जेना याने पॅरिस ऑलम्पिकमध्ये पात्र झाला आहे. नीरजने भालाफेकीत पहिल्या प्रयत्नाता 82.38 मीटर थ्रो केला. दुसऱ्या प्रयत्नात त्याने 84.49 मीटर दूर थ्रो केला. चौथ्या प्रयत्नात नीरज याने 88.88 मीटर भाला फेकला. पाचव्या प्रयत्नात त्याने 80.80 मीटर थ्रो केला. तर जेना याने चौथ्या प्रयत्नात 87.54 मीटर थ्रो केला. किशोर जेना याने रौप्य पदकावर नाव कोरलेय.
Asian Games 2023 Live: 4x400 मीटर रिलेमध्ये रौप्य
भारतच्या महिला संघाने 4x400 मीटर रिले स्पर्धेत दमदार कामगिरी करत पदक मिळवले आहे. ऐश्वर्या, प्राची, शुभा आणि विथ्या यांनी शानदार कामगिरी करत रौप्य पदकावर नाव कोरले आहे.
अविनाश साबळेला आणखी एक पदक
बीडचा अविनाश साबळे याने आणखी एक पदक पटकावले आहे. साबळे याने 5000 मीटर स्पर्धेत रौप्य पदक मिळवले आहे. याआधी त्याने सुवर्णकामगिरी केली होती.
सुनील कुमारने जिंकले गोल्ड
हरमिलन बैंस हिने महिला 800 मीटर रेसमध्ये रौप्य जिंकले आहे. तर सुनील कुमार याने रेसलिंगमध्ये गोल्ड मेडल जिंकले आहे. त्याशिवाय स्क्वॉश बॉक्सिंग आणि रेसलिंगमध्ये 1-1 कांस्य जिंकले आहे.