नांदेड : शासकीय रुग्णालयात (Government Hospital) 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. तर दुसऱ्या दिवशी पुन्हा 7 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. विशेष म्हणजे अजूनही या रुग्णालयात मृतांचा तांडव सुरूच आहे. कारण, पुन्हा मागील 24 तासांत 6 रुग्णांचे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ज्यात 2 नवजात बालक व 4 प्रौढ पुरूष यांचा समावेश आहे. तसेच, सद्यस्थितीत 823 रुग्ण रुग्णालयामध्ये भरती असल्याची माहिती वैद्यकिय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात एकुण 1 हजार 585 रुग्णांनी ओपीडीमध्ये उपचार घेतला. सद्यस्थितीत 823 रुग्ण रुग्णालयामध्ये भरती आहेत. मागील 24 तासात म्हणजेच दि. 2 ऑक्टोंबर ते 3 ऑक्टोंबरच्या मध्यरात्रीपर्यंत एकुण 221 नवीन रुग्णांची भरती झालेली आहे. या 24 तासात 118 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. याचबरोबर या 24 तासात 6 अतिगंभीर रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात 2 नवजात बालक व 4 प्रौढ पुरूष यांचा समावेश आहे. गत 24 तासात 29 रुग्णांवर मोठ्या शस्त्रक्रिया तर 10 रुग्णांवर लहान शस्त्रक्रिया करण्यात आल्या. 26 प्रसुती करण्यात आल्या. यात 12 सीझर होत्या तर 14 नॉरमल प्रसुती झाल्या अशी माहिती वैद्यकिय अधिक्षक गणेश मनुरकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
प्रशासनासह सरकार लागलं कामाला...
नांदेड येथील घटनेनंतर आता प्रशासन आणि सरकारकडून याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. दरम्यान, रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक पातळीवर मंजूर असलेली वर्ग 4 ची सुमारे 60 कर्मचारी तातडीने भरण्याचे निर्देश वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी झालेल्या बैठकीत दिले. याचबरोबर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी वर्ग 3 ची सुमारे 130 कर्मचारी भरण्याची प्रक्रिया शासन स्तरावर झाली असून, ती 1 महिन्यात नियुक्त करण्याच्या सूचना आयुक्त राजीव निवतकर यांना देण्यात आल्या आहेत. वर्ग-1 व वर्ग-2 ची पदे राज्यसेवा आयोगाच्या मार्फत तात्काळ भरण्याबाबत तातडीने प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय मंत्री म्हणाले. तसेच, औषधासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असेही मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. या रुग्णालयातील अस्वच्छता व अल्प कर्मचारी, व्यवस्थापन याचे समर्थन करता येणार नाही. यात सुधारणा करण्यासाठी काहीही कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
इतर महत्वाच्या बातम्या: