मुंबई : दोन आठवड्यांच्या जोरदार कामगिरीनंतर आशियाई खेळ 2023 (Asian Games) चीनमधील (China) हांगझो ऑलिम्पिक स्पोर्ट्स सेंटर स्टेडियमवर समारोप समारंभ पार पडला. आशियाई खेळांचा हा समारोप भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5.30 वाजता सुरू झाला. दरम्यान या कार्यक्रमांचे लाईव्ह स्ट्रीमिंग आणि टेलिकास्ट भारतातही उपलब्ध झाले होते. ‘हार्ट टू हार्ट’ असं यंदाच्या या खेळाचं ब्रीदवाक्य होतं. दरम्यान याच पार्श्वभूमीवर या समारंभात एकोप्याचं दर्शन झालं. तर या समारंभात सर्वांच्या नजरा या खेळाडूंवर स्थिरावल्या.
भारताची दमदार कामगिरी
भारताने आशियाई स्पर्धांमध्ये शंभरचा आकडा पार केला. दरम्यान या स्पर्धेमध्ये भारताच्या खात्यामध्ये 107 पदकं जमा झाली. यामध्ये 28 सुवर्ण, 38 रौप्य आणि 41 कांस्य पदकांचा समावेश आहे. कबड्डी, क्रिकेट, हॉकी यांसारख्या अनेक स्पर्धांमध्ये भारताच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. याचमुळे आशियाई क्रीडा स्पर्धांच्या गुणतालिकेत भारताला चौथ्या स्थानावर स्थिरावण्याचा मान मिळाला. दरम्यान भारताच्या या खेळाडूंचं भारतीयांनी अगदी भरभरुन कौतुक देखील केलं. तर यामध्ये भारताच्या लेकींना देखील भारताची मान अभिमाने उंचावली. भारतीय महिला क्रिकेट आणि कबड्डी संघाने दमदार कामगिरी केली.
पहिल्या तीन स्थानावर 'हे' देश
दरम्यान या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर चीन आहे. चीनने या स्पर्धेमध्ये एकूण 383 पदकांची कमाई केली. यामध्ये 201 सुवर्ण, 111 रौप्य आणि 71 कांस्य पदकं आहेत. तर जपानने या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. जपानच्या खात्यामध्ये एकूण 188 पदकांची कमाई केली. यामध्ये 52 सुवर्ण, 67 रौप्य आणि 69 कांस्य पदकांचा समावेश आहे. तर साऊथ कोरिया तिसऱ्या स्थानावर स्थिरावला आहे. 42 सुवर्ण, 59 रौप्य आणि 89 कांस्य पदकं साऊथ कोरियाला मिळाली आहेत.
या समारोपामध्ये चीनच्या संस्कृतीचे आणि आधुनिकतेचे दर्शन झाले. तर या समारोपाच्या समारंभात आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील करण्यात आली. या समारंभात दोन हजारांहून अधिक कलाकरांनी सादरीकरण केले. त्यामुळे नेत्रदीपक असा हा सोहळा ठरला.