जकार्ता : उत्तर बंगालमधील जलपाईगुडी शहरात बुधवारी आनंदाची लाट आली, जेव्हा एका रिक्षा चालकाच्या मुलीने एशियाडमध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली. भारताच्या स्वप्ना बर्मनने हेप्टॅथ्लॉन प्रकारात भारताला एशियाडचं सुवर्णपदक मिळवून दिलं. एशियाडच्या इतिहासात हेप्टॅथ्लॉनचं सुवर्णपदक पटकावणारी ती पहिली भारतीय महिला ठरली.

स्वप्नाने या प्रकारात 6026 गुणांची कमाई करत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. हेप्टॅथ्लॉनमध्ये अॅथलेटिक्सच्या सात खेळांचा समावेश होतो. त्यात 100 मीटर्स, 200 मीटर्स, 800 मीटर्स धावण्याची शर्यत खेळवली जाते. याशिवाय उंच उडी, लांब उडी, गोळाफेक आणि भालाफेकीचाही हेप्टॅथ्लॉनमध्ये समावेश असतो. स्वप्नाने या सातही खेळांत सर्वाधिक गुणांची कमाई करत अकरावं सुवर्ण भारताच्या झोळीत टाकलं.

आईने स्वतःला मंदिरात बंद करुन घेतलं होतं

स्वप्नाने सात स्पर्धांमध्ये एकूण 6026 गुणांची कमाई करत पहिलं स्थान मिळवल्याची बातमी जेव्हा तिच्या गावात पोहोचली, तेव्हा एकच जल्लोष झाला. मिठाई वाटण्यात आली. आपल्या मुलीच्या यशाने आईला एवढा आनंद झाला, ती त्यांना शब्दही फुटत नव्हते. मुलीच्या यशासाठी आईने दिवसभर देवासमोर प्रार्थना केली. स्वप्नाच्या आईने स्वतःला काली माताच्या मंदिरात बंद करुन घेतलं होतं. या आईने आपल्या मुलीला इतिहास रचताना पाहिलं नाही, कारण, मुलीसाठी प्रार्थना करण्यात त्या व्यस्त होत्या.



“मुलीची कामगिरी पाहू शकले नाही. मी दुपारी दोन वाजल्यापासून प्रार्थना करत होते. हे मंदिर तिने (स्वप्नाने) बनवलं आहे. काली मातावर माझी प्रचंड श्रद्धा आहे. तिच्या यशाची बातमी जेव्हा मला मिळाली, तेव्हा अश्रू अनावर झाले. स्वप्नाचे वडील पंचन बर्मन रिक्षा चालवतात, मात्र गेल्या काही दिवसांपासून आजारामुळे ते अंथरुणावर आहेत. हे तिच्यासाठी सोपं नव्हतं. आम्ही तिच्या गरजा पूर्ण करु शकत नाहीत, पण तिने कधीही तक्रार केली नाही,” अशी भावूक प्रतिक्रिया स्वप्नाची आई बशोना यांनी दिली.

बूट घालण्यासाठी संघर्ष

एक वेळ अशी होती, जेव्हा स्वप्नाला योग्य बूट निवडण्यासाठीही संघर्ष करावा लागत होता, कारण तिच्या दोन्ही पायाला सहा-सहा बोटं आहेत. पायाच्या अतिरिक्त रुंदीमुळे तिला खेळात अडचण येत होती, त्याचमुळे तिचे बूट लवकर खराब व्हायचे.



स्वप्नाला खेळासंबंधी वस्तू खरेदी करताना मोठ्या अडचणी येतात, असं तिचे प्रशिक्षक सुकांत सिन्हा सांगतात. “मी 2006 ते 2013 या काळात तिचा प्रशिक्षक होतो. ती अत्यंत गरीब कुटुंबातून असून तिला प्रशिक्षणाचा खर्चही झेपत नाही. ती जेव्हा चौथीत होती, तेव्हाच मी तिच्यातले गुण ओळखले होते. त्यानंतर तिला प्रशिक्षण देणं सुरु केलं,” अशी प्रतिक्रिया सुकांत सिन्हा यांनी दिली.



विशेष म्हणजे, स्वप्नाने जेव्हा ही सुवर्ण कमाई केली, तेव्हा ती दाढ दुखीच्या वेदनांनी त्रस्त होती. या सर्व गोष्टींवर मात करत तिने इंडोनेशियात तिरंगा फडकवला.