गुंतवणूकदारांची फसवणूक, भाजप आमदाराच्या पतीला बेड्या
एबीपी माझा वेब टीम | 30 Aug 2018 07:51 AM (IST)
बनवारीलाल कुशवाह हे भाजपच्या विद्यमान आमदार शोभाराणी कुशवाह यांचे पती आहेत. शोभाराणी या राजस्थानातील धोलपूरमधून भाजपच्या आमदार आहेत.
जालना : दामदुप्पट पेसे देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या राजस्थानमधील माजी आमदाराच्या जालना पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. जालन्यातील तब्बल तीन हजार गुंतवणूकदारांना माजी आमदार बनवारीलाल कुशवाह यांनी फसवलं. बनवारीलाल कुशवाह हे भाजपच्या विद्यमान आमदार शोभाराणी कुशवाह यांचे पती आहेत. शोभाराणी या राजस्थानातील धोलपूरमधून भाजपच्या आमदार आहेत. बनवारीलाल कुशवाह हे गरिमा रिअल इस्टेट अलाईड लिमिटेड या कंपनीचा सूत्रधार आहेत. जालन्यात त्याच्याविरोधात फसवणुकीच्या अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. त्यानंतर दोन महिन्यांपूर्वीच त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. अखेर जालन्यातील आर्थिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत, थेट राजस्थानातून बनवारीलाल कुशवाह यांना अटक केली.