मुंबई : आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकीने विविध भूमिकांना न्याय दिला आहे. त्याची सीक्रेड गेम्स ही वेब सीरिज सध्या चर्चेत आहे. यानंतर एका नव्या भूमिकेतून तो प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडण्यासाठी सज्ज आहे.


उर्दू लेखक सआदत हसन मंटो यांच्या जीवनावर आधारित सिनेमात नवाझुद्दीन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नंदिता दास दिग्दर्शित या सिनेमाबाबत असं बोललं जातंय, की या सिनेमात काम करण्यासाठी अनेक कलाकारांना मानधन घेतलेलं नाही.

नंदिता दास एका मुलाखतीत म्हणाल्या, की “नवाझने या सिनेमात काम करण्यासाठी फक्त एक रुपया घेतला. सर्वच कलाकारांनी याचप्रकारे पाठिंबा दिला तेव्हा मी हैराण झाले. ऋषी कपूर, परेश रावल, रणवीर शौरी, दिव्या दत्ता आणि जावेद अख्तर यांनी मानधन घेतलं नाही. ऋषी कपूर यांनी या गोष्टीचे संकेत तर पहिल्या भेटीतच दिले होते. परेश रावल यांनी माझ्यासोबत याअगोदरही काम केलेलं आहे. कॅमेऱ्याच्या मागे चांगल्या कलाकाराबाबत असं म्हटलं जाऊ शकतं की, तो चांगल्या कामासाठी नेहमीच उत्सुक असतो.”

नंदिता दास यांनी पुढे सांगितलं, की “जीवनात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांचं मूल्य पैशांपेक्षा अधिक आहे. एखादं आवडीचं काम, जे तुम्हाला अनुभव आणि आनंद देतं, ते पैशांपेक्षा जास्त महत्त्वाचं असतं. मी स्वतः अशा अनेक प्रोजेक्टमध्ये काम केलं आहे आणि पैशांकडे लक्षही दिलेलं नाही.”

नवाझला मुख्य भूमिकेत घेण्याबाबत नंदिता दास यांनी या अगोदरही सांगितलेलं आहे. “नवाझचं व्यक्तिमत्त्व आणि मंटो यांची भूमिका मिळतीजुळती आहे. मंटो यांचा दृष्टीकोन, अभ्यास, राग, संवेदनशीलता, हसरा स्वभाव या सर्व गोष्टी नवाझमध्ये दिसतात आणि तो ही भूमिका निभावण्यासाठी सक्षम आहे,” असं नंदिता दास सांगतात.

नंदिता दास दिग्दर्शित या सिनेमाचा ट्रेलर 15 ऑगस्टला रिलीज करण्यात आला होता. प्रेक्षकांनी ट्रेलरला चांगलीच पसंती दिल्याचं चित्र आहे. सिनेमा 21 सप्टेंबरला रिलीज होणार आहे.

पाहा ट्रेलर