जकार्ता : एशियाड स्पर्धेच्या नवव्या दिवशी भारताची महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत सिंधूने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जपानच्या अकाने यामागुचीचा पराभव केला. 1962 नंतर भारतीय महिला बॅडमिंटनपटूने प्रथमच अंतिम फेरी गाठली आहे.

सिंधूने जपानच्या अकाने यामागुचीचा 21-17, 15-21, 21-10 असा पराभव केला. सिंधूला या विजयासाठी शेवटच्या सेटपर्यंत झुंज द्यावी लागली. या विजयामुळे सिंधूने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला असून भारताचे किमान रौप्यपदक निश्चित झाले आहे. अंतिम फेरीत सिंधू चीनच्या ताई त्झु यिंगशी भिडणार आहे.

पी. व्ही. सिंधूनं दुसऱ्या उपांत्य सामन्यात थायलंडच्याच निपॉन जिंदापॉलचं आव्हान 21-11, 16-21, 21-14 असं मोडून काढलं.

चीनच्या ताई त्झु यिंगने उपांत्य फेरीत भारताच्या सायना नेहवालवर सलग दोन सेट्समध्ये मात करत अंतिम फेरी गाठली. त्यामुळे सायनाला कांस्य पदकांवर समाधान मानावे लागले.

खरंतर सायना नेहवाल या स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारेल असा अनेक क्रीडाप्रेमींचा अंदाज होता. मात्र उपांत्य सामन्यात तिला चीनच्या ताई त्झू यिंगकडून पराभव स्वीकारावा लागला. यिंगने सायनाचा 21-17, 21-14 असा पराभव केला.

जागतिक क्रमवारीमध्ये प्रथम स्थानावर असलेल्या चीनच्या ताई त्झू यिंगने दहाव्या क्रमांकावरील सायनाचा हा सलग दहाव्यांदा पराभव केला आहे.