काल दुपारी पावणेतीन वाजता औरंगाबादेतून दहशतवाद विरोधी पथकाच्या सुमारे 50 अधिकारी व कर्मचार्यांची 5 वाहने या मोहीमेवर रवाना झाली होती. त्यांच्यासोबत न्यायवैद्यक प्रयोगशाळेसह बॉम्बशोधक-नाशक पथक आणि श्वानपथकातील गौरी होती.

जालन्यातील भाजपचा माजी नगरसेवक आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी असलेला खुशालसिंग ठाकूर याच्या मालकीच्या फार्म हाऊसवर ही धाड पडल्याने जालन्यात खळबळ उडाली आहे.
जालन्याच्या स्थानिक राजकारणात पांगारकर, ठाकूर हे समविचारी मित्र असल्याची त्यांची ओळख आहे. दुपारी पावणेचार वाजता हे पथक रेवगावातील फार्महाऊसवर पोहोचले. तेथील एका विहिरीच्या परिसरासह दोन मजली आणि पाच खोल्यांचे बांधकाम असलेल्या इमारतीचीही त्यांनी झडती घेतली. या झडतीत पथकाने काय जप्त केले, याचा तपशिल मात्र लगेच समजू शकला नाही. जालन्यातील विश्रामगृहावर दहशतवाद विरोधी पथकाच्या अधिकार्यांनी खुशालसिंग ठाकूरला चौकशीसाठी बोलावले होते.
2014 पूर्वी भाजपचा नगरसेवक असलेला खुशालसिंग ठाकूर सनातनचा साधक, जिल्ह्यात विश्व हिंदू परिषदेसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघांशी निगडीत असलेला व्यक्ती म्हणून त्याची त्या काळात ओळख होती. वैभव राऊतच्या कारस्थानाचा फायनान्सर श्रीकांत पांगारकर असल्याचे तपासात स्पष्ट झाल्यानंतर आता दुसरी धाड पांगारकरच्या संदर्भाने व त्याने दिलेल्या माहितीवरुन जालना शहराजवळ पडल्याने पांगारकर आणि वैभव राऊतच्या कारस्थानामध्ये खुशालसिंग ठाकूरचा कितपत सहभाग आहे, ही नवी चर्चा जिल्ह्यात सुरु झाली आहे.
खुशालसिंग ठाकूरने 2014 सालात राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर विधानसभेची निवडणूक लढविली होती. सध्या अंदाजे 65 वर्ष वय असलेला खुशालसिंग ठाकूर यांची जालन्यातील राजूर रोड परिसरात 22 एकर बागायती शेती आहे. त्यांच्याच रेवगावच्या फार्महाऊसवर पांगारकरने बॉम्ब तयार केल्याचा खुलासा तपासात झाल्यानंतर दहशतवाद विरोधी पथकाने तेथे ही धाड टाकली. या धाडीच्या वेळी पथकाने श्रीकांत पांगारकरलाही सोबत नेले होते. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ही झडती सुरु होती. या फार्महाऊसवरील शेळ्यांचा गोठा (गोटशेड) सुद्धा या कर्मचार्यांनी बराचवेळ तपासला होता. त्यानंतर रेवगावपासून 3 कि.मी. अंतरावरील सारवाडी ते पोकळवडगाव दरम्यान रेल्वे रुळाजवळच्या तलावात दडवलेले बॉम्ब निर्मितीचे साहित्यही या पथकाच्या हाती लागल्याचे सांगण्यात आले. श्रीकांत पांगारकरने दिलेल्या माहितीवरुनच धाड टाकणार्या पथकाने या परिसरात तपासणी केली.