जकार्ता : भारतीय पुरुष कबड्डी संघाचं एशियाडमध्ये सलग आठवं सुवर्णपदक मिळवण्याचं स्वप्नं अखेर अधुरंच राहील. जकार्ता एशियाडमध्ये उपांत्य सामन्यात इराणकडून भारताला 27-18 असा धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे भारताला कांस्यपदकावर समाधान मानावं लागणार आहे.


सुरुवातीला भारताने 6-0 अशी आघाडी घेतली होती. पण इराणने दुसऱ्या सत्रात आक्रमक खेळ करत भारताच्या हातून विजयाची संधी हिरावली. एशियाडच्या इतिहासात कबड्डीची अंतिम फेरी न गाठण्याची ही भारताची पहिलीच वेळ ठरली आहे. 1990 पासून गेल्या सात एशियाडमध्ये भारताने कबड्डीचं सुवर्णपदक पटकावलं होतं.

इराणने आज सेमी फायनलमध्ये भारताला हरवून 2014 च्या एशियाडमधील अंतिम सामन्यातील पराभवाचा बदलाही घेतला. अटीतटीच्या झालेल्या 2014 च्या अंतिम सामन्यात भारताने इराणवर 27-25 ने मात केली होती.

आज झालेल्या उपांत्य सामन्यात दुसऱ्या हाफमध्येच भारतावर पराभवाचं सावट दिसू लागलं होतं. दुसऱ्या हाफमधील बाराव्या मिनिटानंतर इराणने भारतावर 17-13 ची आघाडी घेतली. यानंतर भारताला पुनरागमनाची संधी न देता इराणने विजय नोंदवला.

फायनलमध्ये इराणचा सामना आता दक्षिण कोरियाविरुद्ध होणार आहे. दक्षिण कोरियाने पाकिस्तानवर मात केली होती. भारताला आता कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं आहे.