Women's Emerging Asia Cup : भारतीय महिला संघाने बांगलादेशचा पराभव करत एमर्जिंग आशिया चषकावर नाव कोरले. भारतीय महिला अ संघाने फायनलमध्ये प्रथम फलंदाजी करताना सात विकेटच्या मोबदल्यात १२७ धावांपर्यंत मजल मारली होती. प्रत्युत्तरदाखल बांगलादेश महिला संघ ९६ धावांपर्यंत मजल मारु शकला. भारतीय महिला अ संघाने ३१ धावांनी विजय मिळवत आशिया चषकावर नाव कोरले. श्रेयांका पाटील हीने एमर्जिंग आशिया कप स्पर्धेत टीम इंडियासाठी शानदार कामगिरी केली. श्रेयांकाने या स्पर्धेत एकूण 9 विकेट्स घेतल्या.


भारतीय महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार श्वेता सहरावत आणि उमा चेत्री या जोडीने सावध सुरुवात केली. पण ही जोडी फक्त २८ धावाच करु शकली. त्यानंतर कनिका अहूजा हिने 30 धावा तर वृंदा दिनेश हिने 36 धावा जोडल्या. भारतीय संघाने निर्धारित २० षटकात 127 धावा जोडल्या.  बांगलादेशकडून सुल्ताना खातून आणि नाहिदा अख्तर यांनी प्रत्येकी  दोन दोन विकेट घेतल्या. 











भारतीय संघाने दिलेल्या १२८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा संपूर्ण संघ 96 धावांत तंबूत परतला.  बांगलादेश संघातील फक्त तीन फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली. भारतीय संघाच्या विजयात श्रेयांका पाटील हिने मोलाची भूमिका बजावली. श्रेयंका पाटील हिने चार षटकात अवघ्या १३ धावा खर्च करत चार विकेट घेतल्या.  मन्नत कश्यप हिने 3 आणि कनिका अहूजा हिने 2 विकेट घेतल्या. 







फक्त दोन सामन्यात चॅम्पियन -


टीम इंडिया फक्त 2 सामने जिंकून आशिया चॅम्पियन ठरली आहे. टीम इंडियाने या स्पर्धेत हाँगकाँग विरुद्ध विजय मिळवला. त्यानंतर नेपाळ आणि पाकिस्तान विरुद्धच्या सामना पावसामुळे रद्द झाला. तर आता अंतिम सामन्यात बांगलादेशचा धुव्वा उडवला. भारताने खेळलेल्या दोन्ही सामन्यात श्रेयांका पाटील हिने प्रभावी कामगिरी केली. हाँगकाँगविरोधात पाच विकेट घेतल्या होत्या... तर फायनलला बांगलादेशविरोधात चार विकेट घेतल्या.  श्रेयांका पाटीलने हीने 2 सामन्यात 7 षटके गोलंदाजी केली. त्यामध्ये फक्त १५ धावा खर्च करत नऊ विकेट घेतल्या. श्रेयांका पाटील हिला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.