Asia Cup 2022: दुबई आंतरराष्ट्रीय स्डेडियमवर (Dubai International Cricket Stadium)  बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात (Bangladesh vs Sri Lanka)  काल (1 सप्टेंबर 2022) खेळण्यात आलेला सामना अशिया चषकातील आतापर्यंतचा सर्वात रोमांचक सामना ठरला. या सामन्यात श्रीलंकेच्या संघानं बांगलादेशचा दोन विकेट्सनं पराभव करून सुपर-4 मध्ये स्थान मिळवलं. आशिया चषकातील पाचव्या सामन्यात बांगलादेशचा संघ श्रीलंकेवर वर्चस्व गाजवताना दिसला. परंतु, अखेरच्या काही षटकात श्रीलंकेच्या फलंदाजांनी तुफान फटकेबाजी करत सामना पलटवला. श्रीलंकेच्या डावातील 19वं षटक सामन्याची दिशा बदलून टाकणार ठरला. श्रीलंकेविरुद्ध पराभवानंतर बांगलादेशच्या संघाचं आशिया चषकातील आव्हान संपुष्टात आलंय. 


या सामन्यात बांगलादेशनं दमदार फलंदाजी केली. ठराविक अंतरनं विकेट पडत असतानाही बांगलादेशच्या फलंदाजांनी धावगती कमी होऊ दिली नाही. दरम्यान, बांगलादेशच्या संघानं 20 षटकात सात विकेट्स गामवून श्रीलंकेसमोर 184 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात श्रीलंकेच्या संघानं सुरुवातीला बांगलादेशला झुंज दिली. श्रीलंकेनं पहिल्या विकेट्ससाठी 45 धावा जोडल्या. मात्र, त्यानंतर श्रीलेकंचा संघ डगमताना दिसला. श्रीलंकेचे फलंदाज झटपट पॅव्हेलियनमध्ये परतले. या सामन्यातील अखेरच्या चार षटकात श्रीलंकेला 43 धावांची गरज होती आणि त्यांच्या 6 विकेट्स पडल्या होत्या. त्यावेळी बांगलादेशचा संघ विजयाच्या उंबराठ्यावर आहे, असं चित्र पाहायला मिळालं. 


कुठं आणि कसा फिरला सामना?
या सामन्यातील सतराव्या आणि आठराव्या षटकात खालच्या फळीच्या फलंदाजांनी 18 धावा करून आणखी एक विकेट्स गमावली. श्रीलंकेला 12 चेंडूत 25 धावांची आवश्यकता होती आणि त्याच्या फक्त तीन विकेट्स शिल्लक राहिल्या होत्या. पण 19 व्या षटकात असं काही घडलं, ज्यामुळं संपूर्ण मैदानात शांतता पसरली. या षटकात श्रीलंकेनं 17 धावा (2 2 5nb 2 1lb W 1w 4) कुटल्या आणि सामन्याचं रुपचं बदललं. त्यानंतर अखेरच्या षटकात   श्रीलंकेला शेवटच्या 6 चेंडूत फक्त 8 धावांची गरज होती, जी त्यांच्या फलंदाजांनी 3 चेंडूत पूर्ण केली आणि त्यांच्या संघाला सामना जिंकून दिला.


सुपर-4 मध्ये स्थान मिळवलेले संघ
आशिया चषकातील सुपर-4 मध्ये आतापर्यंत तीन संघांनी एन्ट्री केलीय. सर्वात प्रथम 'ब' गटातून अफगाणिस्तानच्या संघानं सुपर- 4 मध्ये धडक दिली. त्यानंतर  'अ' गटातून भारतानं पाकिस्तान आणि हाँगकाँगचा पराभव करत सुपर-4 मध्ये स्थान मिळवलं. आता श्रीलंकेचा संघही सुपर-4 मध्ये पोहचलाय. आज हाँगकाँग आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यानंतर सुपर-4 चा चौथा संघही निश्चित होणार आहे.


हे देखील वाचा-