Asia Cup 2023 : श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये खेळवल्या जाणार्‍या आशिया चषकात भारत आजपासून आपली मोहीम सुरु करणार आहे. पहिल्या सामन्यात भारताचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत (India Vs Pakistan) आहे. चार वर्षांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. गेल्या चार वर्षात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार, मधली फळी आणि गोलंदाजीत बरेच बदल झाले आहेत. त्याचवेळी पाकिस्तानचा संघही मोठ्या आत्मविश्वासाने भारताचं आव्हान स्वीकारण्यासाठी सज्ज असल्याचं दिसत आहे.


एकदिवसीय फॉरमॅटमध्ये दोन्ही संघांचा अखेरचा सामना 2019 च्या विश्वचषकात झाला होता. या सामन्यात रोहित शर्माच्या शानदार शतकाच्या जोरावर भारताने पाकिस्तानचा 89 धावांनी पराभव केला होता. तर 2021 मध्ये, पाकिस्तानने T20 वर्ल्ड कपमध्ये अशी कामगिरी केली जी यापूर्वी कधीही झाली नव्हती. विश्वचषक स्पर्धेत भारताला पराभूत करण्यात पाकिस्तानला पहिल्यांदाच यश आलं.


या सामन्यानंतरही भारतीय क्रिकेट संघात चढ-उताराचा काळ सुरु झाला. रोहित शर्माच्या रुपात भारताला नवा कर्णधार मिळाला. विश्वचषकापूर्वी कर्णधार म्हणून सिद्ध करण्याचं आव्हान रोहित शर्मासमोरही आव्हान आहे. आशिया चषक स्पर्धेत भारताचा पराभव करण्यात पाकिस्तानला यश आलं तर पुढील महिन्यात होणाऱ्या स्पर्धेत ते मोठ्या उत्साहाने, आत्मविश्वासाने मैदानात उतरतील. त्यामुळे भारताला या सामन्यात कोणतीही कसर सोडायची नाही आणि पाकिस्तानला पराभूत करण्याचा भारताचा प्रयत्न असेल


टीम इंडियामध्ये अनेक बदल


2019 नंतर भारतीय संघ पूर्णपणे बदललेला दिसेल. रोहित शर्मासोबत सलामीची जबाबदारी युवा खेळाडू शुभमन गिलच्या खांद्यावर आहे. श्रेयस अय्यर आणि इशान किशन मधल्या फळीत असतील. फिरकीची जबाबदारी कुलदीपकडे राहिल. तर वेगवान गोलंदाजीत बुमराहला मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजची साथ मिळेल.


पाकिस्तानचा संघही तोडीस तोड


दुसरीकडे पाकिस्तानचा संघही नव्या कर्णधारासह मैदानात उतरत आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघ अधिक संतुलित दिसत आहे. पाकिस्तानकडे फखर जमान आणि इमामच्या रुपाने दोन इन-फॉर्म सलामीवीर आहेत. तिसर्‍या क्रमांकावर बाबर आझमने जम बसवला आहे. भारताच्या तुलनेत पाकिस्तानच्या फलंदाजीत अधिक खोली आहे. पाकिस्तानकडे इफ्तिखार अहमद, आगा सलमान, शादाब खान आणि मोहम्मद नवाज यांच्या रुपाने चार अष्टपैलू खेळाडू आहेत. याशिवाय शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाह यांच्याकडेही मोठे फटके मारण्याची क्षमता आहे.


पाकिस्तानची वेगवान गोलंदाजीही खूप मजबूत दिसते. शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि हरिस रौफ हे सर्व वेगवान गोलंदाज आहेत. 150 पेक्षा जास्त वेगाने चेंडू फेकण्याची क्षमता रौफकडे आहे. शाहीनच्या वेगवान चेंडूंचा सामना करणं टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरसाठी सोपं नसेल.


हेही वाचा


IND vs PAK Weather : भारत-पाकिस्तान महामुकाबल्यावर पावसाचं सावट, कँडीमध्ये पावसाचा अंदाज