Asia Cup 2023 : क्रिकेटचाहत्यांसाठी आज सुपर सॅटर्डे आहे. कारण आशिया चषकात आज भारत आणि पाकिस्तान (India Vs Pakistan) यांच्यात महामुकाबला होणार आहे. मात्र या सामन्यावर पावसाचं सावट आहे. हा सामना श्रीलंकेतील कँडी इथल्या पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. परंतु आज सकाळपासूनच कँडी शहरात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहेत. जसजसा वेळ पुढे जात आहे तसतसं कँडीच्या आकाशातील ढग अधिक गडद होत आहेत. यासोबतच भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यात पावसाचा खेळ पाहायला मिळू शकतो.


भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना आज दुपारी 3 वाजता सुरु होणार आहे. मात्र त्याचवेळी पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कँडीमध्ये आज पाऊस पडण्याची शक्यता 91 टक्के आहे. तर सामन्यादरम्यान 6 ते 9 ही अशी वेळ असते जेव्हा पावसाची शक्यता कमी असते. त्यामुळे इतक्या कमी वेळेत सामना पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. त्यातच रात्री मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


महत्त्वाचं म्हणजे भारत आणि पाकिस्तानमधील हा ग्रुप स्टेजचा सामना असल्याने राखीव दिवसाची तरतूद नाही. त्यामुळे सामना रद्द झाल्यास, दोन्ही संघांमध्ये गुण विभागून दिले जातील. मात्र, पुढील फेरीनंतर अंतिम फेरीतही दोन्ही संघ आमनेसामने येण्याची शक्यता आहे. पण श्रीलंकेतील हवामान पाहता त्या दोन्ही सामन्यांमध्ये पावसाचा व्यत्यय येणार नाही, असं म्हणणं धाडसाचं ठरेल.


यंदाच्या आशिया चषकाच्या यजमानपदाचा अधिकार पाकिस्तानकडे होता. परंतु भारताने पाकिस्तानला जाण्यास आणि सामने खेळण्यास नकार दिल्यामुळे श्रीलंकेलाही यजमानपद मिळाले. मात्र, त्यावेळीही पावसाळ्यात श्रीलंकेत सामने आयोजित करणं कितपत योग्य होतं, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.


सामना रद्द झाल्यास नियम काय आणि DLS नियम कधी लागू होईल?


भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळवण्यात येणाऱ्या सामन्याचा निकाल लावण्यासाठी, दोन्ही संघांना किमान 20 षटके मैदानावर घालवावी लागतील, म्हणजेच दोन्ही संघांना 20-20 षटकं खेळणं आवश्यक आहे. कारण एकदिवसीय सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार निकाल लावले जातात. त्यासाठी दोन्ही संघांनी 20 षटके खेळणे आवश्यक आहे. आजचा सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना 1-1 गुण विभागून दिला जाईल. पाकिस्तानने नेपाळविरुद्ध खेळलेला पहिला सामना जिंकल्याने आजचा सामना रद्द झाला तर पाकिस्तान 3 गुणांसह सुपर-4 साठी पात्र ठरेल. तर सुपर-4 मध्ये दाखल होण्यासाठी भारताला शेवटचा सामना जिंकावा लागेल.


वर्षभरानंतर दोन्ही संघ भिडणार


भारत आणि पाकिस्तानचे संघ जवळपास वर्षभरानंतर आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांमधला शेवटचा सामना ऑक्टोबर 2022 मध्ये झाला होता. आता दहा महिन्यांनी दोन्ही संघ एकमेकांना आव्हान देतील.


हेही वाचा


India Vs Pakistan Asia Cup 2023 : आशिया चषकात भारत-पाकिस्तान यांच्यात आज महामुकाबला, आकडेवारीत कोणाचं पारडं जड?