Asia Cup 2023 : आशिया चषकात ज्या सामन्याची प्रतीक्षा क्रिकेटचाहते चातकाप्रमाणे करत होते, तो सुरु होण्यासाठी आता फक्त काही तास उरले आहेत. भारत आणि पाकिस्तान (India Vs Pakistan) यांच्या आज (2 सप्टेंबर) हा महामुकाबला रंगणार आहे. दोन शेजारील देश आणि पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील हा सामना श्रीलंकेतील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजता सुरु होईल. हा समाना सुरु होण्यापूर्वी दोन्ही संघांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर ती आश्चर्यचकित करणारी आहे.


आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान 17व्यांदा आमनेसामने येणार आहेत. आशिया चषकाच्या मागील 15 हंगामात दोन्ही संघ T20 आणि एकदिवसीय फॉरमॅटसह एकूण 16 वेळा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. या 16 सामन्यांपैकी एका सामन्याचा (वर्ष 1997) निकाल लागला नाही. उर्वरित 15 सामन्यांमध्ये दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली.


1984 ते 2018 दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषकाच्या एकदिवसीय फॉरमॅटमध्ये एकूण 13 सामने खेळवण्यात आले, ज्यामध्ये भारताने सात वेळा पाकिस्तानला पराभूत केलं. त्याचवेळी पाकिस्तानने पाच वेळा विजयाची नोंद केली, तर एका सामन्याचा निकाल लागला नाही. भारतीय संघाने 1984, 1988, 2008, 2010, 2012 आणि 2018 मध्ये दोन वेळा पाकिस्तानला पराभूत केलं. तर दुसरीकडे, 1995 साली शारजाच्या मैदानावर झालेल्या आशिया चषकात भारताविरुद्धचा पहिला सामना पाकिस्तानने जिंकला होता. यानंतर 2000, 2004, 2008 आणि 2014 मध्येही पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता.


आशिया चषकात T20 फॉरमॅटमध्ये भारत आणि पाकिस्तान फक्त तीन वेळा आमनेसामने आले आहेत. त्यापैकी दोन सामन्यात भारताने विजय मिळवला तर एका सामन्यात पाकिस्तानने विजयाची नोंद केली. 2016 मध्ये भारताने पाकिस्तानचा 5 विकेट्सने पराभव केला होता. तर 2022 मध्ये भारताने ग्रुप स्टेजमध्ये तर सुपर-4 मध्ये पाकिस्तानने बाजी मारली होती. त्यामुळे ही आकडेवारी पाहता आज होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्यातील उत्कंठा शिगेला पोहोचणार हे स्पष्ट आहे.


आशिया कपमधील भारत-पाकिस्तान सामन्यांचे निकाल


1984: भारताचा 84 धावांनी विजय, शारजाह 
1988: भारताचा 4 विकेट्सनी विजय, ढाका 
1995: पाकिस्तानचा 97 धावांचा विजय, शारजाह 
1997: निकाल नाही, कोलंबो 
2000: पाकिस्तानचा 44 धावांनी विजय, ढाका 
२००४: पाकिस्तानचा 59 धावांनी विजय, कोलंबो 
२००८: भारताचा 6 विकेट्सनी विजय, कराची 
२००८: पाकिस्तानचा 8 विकेट्सनी विजय, कराची
2010: भारताचा 3 विकेट्सनी विजय, दांबुला 
2012: भारताचा 6 विकेट्सनी विजय, मीरपूर 
2014: पाकिस्तानचा 1 विकेटने विजय, मीरपूर 
2016: भारताचा 5 विकेट्सनी विजय, मीरपूर (टी20)
2018: भारताचा 8 विकेट्सनी विजय, दुबई 
2018: भारताचा 9 विकेट्सनी विजय, दुबई 
2022: भारताचा 5 विकेट्सनी विजय, दुबई  (टी20)
2022: पाकिस्तानचा 5 विकेट्सनी विजय, दुबई (टी20)


या सामन्यासाठी पाकिस्तानने प्लेईंग-11 जाहीर केला आहे. ज्या खेळाडूंनी नेपाळविरुद्धचा सलामीचा सामना जिंकला होता त्याच खेळाडूंना पाकिस्तानने प्लेईंग-11 मध्ये संधी दिली आहे. दुसरीकडे, भारताची प्लेईंग-11 नाणेफेकीच्या वेळीच कळेल. भारतीय संघात  तीन वेगवान गोलंदाज, दोन अष्टपैलू, एक फिरकीपटू आणि पाच फलंदाजांना संधी मिळण्याची शक्यता आहे. सूर्यकुमार यादव प्लेईंग-11 मध्ये सामील होण्याची शक्यता नाही. तसंच शार्दुल ठाकूरऐवजी मोहम्मद सिराजला संधी दिली जाऊ शकते.


भारताविरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तानचे प्लेईंग-11 : बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), शादाब खान (उपकर्णधार), मोहम्मद नवाज, हरिस रौफ , नसीम शाह आणि शाहीन शाह आफ्रिदी.


पाकिस्तानविरुद्ध भारताचे संभाव्य प्लेईंग-11 : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.