Asia Cup 2022: आशिया चषकातील पाचव्या सामन्यात श्रीलंका-बांग्लादेश ( Sri Lanka vs Bangladesh) यांच्यात जोरदार टक्कर पाहायला मिळाली. या सामन्यात कोणता संघ बाजी मारणार? याचा अंदाज लावणं अखेरपर्यंत कठीण होतं. या सामन्यात दोन्ही संघांनी बरोबरीची झुंज दिली. परंतु, अखेरच्या काही षटकात बांगलादेशनं खराब गोलंदाजी केली आणि सामना श्रीलंकेच्या बाजूनं झुकला. बांग्लादेशला दोन विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह बांगलादेशचं आशिया चषकातील आव्हान संपुष्टात आलंय. बांगलादेशला अशा मानहानिकारक पराभवाला सामोरे जाताना पाहून स्टेडियममध्ये उपस्थित एक चिमुकला रडकुंडीला आला. त्याचा रडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल
बांगलादेशच्या तोंडातून विजयी घास हिसकावून श्रीलंकेच्या संघानं सुपर-4 मध्ये धडक दिली. त्यावेळी बांगलादेशच्या संघाला चीअर करण्यासाठी दुबईच्या स्टेडियमवर आलेल्या एका चिमुकल्या चाहत्याला अश्रु अनावर झाले. बांगलादेशचा पराभव त्याच्या जिव्हारी लागला आणि तो स्टेडियममध्ये ढसाढसा रडायला लागला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.


व्हिडिओ-



कुठं आणि कसा फिरला सामना?
या सामन्यातील सतराव्या आणि आठराव्या षटकात खालच्या फळीच्या फलंदाजांनी 18 धावा करून आणखी एक विकेट्स गमावली. श्रीलंकेला 12 चेंडूत 25 धावांची आवश्यकता होती आणि त्यांच्या फक्त तीन विकेट्स शिल्लक राहिल्या होत्या. पण 19 व्या षटकात असं काही घडलं, ज्यामुळं संपूर्ण मैदानात शांतता पसरली. या षटकात श्रीलंकेनं 17 धावा (2 2 5nb 2 1lb W 1w 4) कुटल्या आणि सामन्याचं रुपच बदललं. त्यानंतर अखेरच्या षटकात  श्रीलंकेला शेवटच्या 6 चेंडूत फक्त 8 धावांची गरज होती, जी त्यांच्या फलंदाजांनी 3 चेंडूत पूर्ण केली आणि त्यांच्या संघाला सामना जिंकून दिला.


श्रीलंकेचा बांगलादेशवर दोन विकेट्सनं विजय
आशिया चषकातील पाचव्या सामन्यात श्रीलंकेच्या संघानं नाणेफेक जिंकून बांगलादेशच्या संघाला गोलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. त्यानंतर बांगलादेशच्या संघानं 20 षटकात 7 विकेट्स गमावून श्रीलंकेसमोर 184 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्त्युत्तरात श्रीलंकेच्या संघानं दोन विकेट्स राखून हा सामना जिंकला. याविजयासह श्रीलंकेच्या संघानं सुपर-4 मध्ये एन्ट्री केलीय. तर, बांगलादेशच्या संघाचं आशिया चषकातील आव्हान संपुष्टात आलं आहे. 


हे देखील वाचा-