Virat Kohli Century: मागील दोन वर्षांपासून सुरु असलेल्या शतकांचा दुष्काळ विराट कोहलीनं अखेर संपवला आहे. अफगाणिस्तानविरोधात विराट कोहलीनं वादळी शतकी खेळी केली. आशिया चषकात विराट कोहलीनं दमदार फलंदाजी केली. अफगाणिस्तानविरोधात प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीनं आक्रमक फलंदाजी करत शतकांचा दुष्काळ संपवला आहे. विराट कोहलीनं 55 चेंडूत शतक झळकावलं. 


विराट कोहलीला मागील दोन ते अडीच वर्षात एकही शतक झळकावता आलेलं नव्हतं. त्यामुळे त्याच्यावर वारंवार टीका केली जात होती. माजी क्रिकेटपटूंसह चाहत्यांनी त्याचावर टीकेची झोड उडवली होती. विराट कोहलीला यादरम्यान आपलं कर्णधारपदही गमवावं लागलं होतं. पण तब्बल दोन वर्षानंतर विराट कोहली पुन्हा एकदा फॉर्ममध्ये परतला आहे. विराट कोहलीनं षटकार मारत शतक पूर्ण केलं. आक्रमक फंलदाजी करत भारतीय संघाची धावसंख्या वाढवली. पहिल्यांदा राहुलसोबत भारतीय संघाची धावसंख्या वाढवली. त्यानंतर ऋषभ पंतसोबत त्यानं धावांचा पाऊस पाडला. विराट कोहलीच्या शतकी खेळीनंतर सोशल मीडियावर  त्याचीच चर्चा सुरु झाली. विराट कोहलीला अनेकांनी शतक ठोकल्यानंतर शुभेच्छा दिल्या. सर्वसामान्यांपासून कलाकार आणि क्रिकेटपटूंनी विराट कोहलीच्या शतकानंतर ट्वीट केले आहेत. सोशल मीडियावर सध्या विराट कोहली ट्रेडिंग आहे. 


आशिया चषकात विराट कोहलीनं धावांचा पाऊस पाडला. श्रीलंकेविरोधातील सामन्याचा अपवाद वगळता विराट कोहलीनं आपल्या फलंदाजीनं सर्वांना प्रभावित केलेय. विराट कोहलीनं आशिया चषकात एका शतकासह दोन अर्धशतकं झळकावत सर्वाधिक धावा काढणाऱ्या फंलदाजामध्ये स्थान पटकावलं आहे. विराट कोहलीनं पाकिस्तानविरोधात निर्णायाक 60 धावांची खेळी केली होती. त्यानंतर आता अफगाणिस्तानविरोधात विराट कोहलीनं शतक झळकावलं आहे. विराट कोहलीचं टी 20 क्रिकेटमधील पहिलं शतक होय. याआधी विराट कोहलीनं कसोटी, एकदिवसीय आणि आयपीएलमध्ये शतक झळकावलं आहे. पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये टी 20 विश्वचषक होणार आहे. त्यापूर्वी विराट कोहलीचा फॉर्म भारतासाठी आनंदाची गोष्ट ठरली आहे. अनेकांनी विराट कोहलीच्या फॉर्मवर चिंता व्यक्त केली होती. मात्र, विराट कोहलीनं सर्वांना आपल्या कामगिरीतून उत्तर दिलं आहे. 


विराट कोहलीनं अफगाणिस्तान विरोधात वादळी शतकी खेळी केली. विराट कोहलीच्या नाबाद 122 धावांच्या खेळीच्या बळावर भारतानं निर्धारित 20 षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात 212 धावांचा डोंगर उभा केला. विराट कोहलीनं 61 चेंडूमध्ये 122 धावांचा पाऊस पाडला. या खेळीदरम्यान विराट कोहलीनं सहा षटकार आणि 12 चौकारांचा पाऊस पाडला. विराट कोहलीशिवाय केएल राहुलनं अर्धशतकी खेळी केली.