Asia Cup 2022 : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये आशिया चषकात आज औपचारिक सामना होणार आहे. दोन्ही संघाचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. आशिया चषकातील सुपर 4 मध्ये आज भारतासमोर अफगाणिस्तानचे आव्हान असेल. दोन्ही संघ आशिया चषकाचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न करणार आहेत. साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. सात वाजता नाणेफेकीसाठी दोन्ही संघाचे कर्णधार मैदानात उतरतील. पण त्यापूर्वीच धक्कादायक बातमी समोर आली आहे.  भारत आणि अफगाणिस्तान सामन्यापूर्वी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आग लागली आहे. स्टेडिअमबाहेरुन धुराचे मोठे लोट आलेले दिसत आहेत. 


 






दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमबाहेर लागलेल्या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पण सामना सुरु होण्यापूर्वी लागलेल्या आगीमुळे सोशल मीडियावर याची चर्चा सुरु झाली आहे. आग इतकी मोठी आहे की, धुराचे लोट स्टेडियममध्येही दिसत आहेत. तेथे उपस्थित असणाऱ्यांनी व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. दुबईमधील अग्णिशामन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम करत आहेत. अद्याप कोणतीही जिवितहानी झाल्याचं वृत्त नाही. थोड्याच वेळात भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात आशिया चषकाच्या सामन्याला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी दोन्ही संघाचे चाहते स्टेडियममध्ये येण्यास सुरुवात झाली आहे. धुराचे लोट पाहून चाहत्यांमध्ये चर्चा सुरु आहे.


रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाला आशिया चषकात आपेक्षित खेळ करता आला नाही. गतविजेत्या भारतीय संघाला सुपर 4 फेरीत सलग दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. भारत आणि अफगाणिस्तान संघाला सुपर 4 मध्ये श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. आशिया चषकात भारताला गोलंदाजी आणि फलंदाजीत सातत्य राखता आलं नाही. भारताचा मध्यक्रम अपयशी ठरला तसेच अखेरच्या षटकांत भारतीय गोलंदाजांना प्रभावी मारा करता आला नाही. तसेच क्षेत्ररक्षणातील काही चुकाही महागड्या ठरल्या.  टीम इडिंयाने या चुकांमधून धडा घेणे गरजेचे आहे. अफगाणिस्तानचा पराभव करत आशिया चषकाचा शेवट गोड करण्यासाठी भारतीय संघ आज मैदानात उतरणार आहे. अफगाणिस्तानकडे आक्रमक फलंदाजांचा भरणार आहे. त्याशिवाय दर्जोदार फिरकी गोलंदाजीही त्यांची ताकद आहे. भारताविरोधात धक्कादायक निकाल नोंदवण्याची क्षमता अफगाणिस्तानमध्ये आहे. त्यामुळे आजचा सामना औपचारिक असला तरी अटीतटीचा होण्याची शक्यता आहे.