IND vs Pak Asia cup 2022 : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना म्हटले की, सर्व जगाचं लक्ष लागलेलं असतं. या सामन्याला भारत आणि पाकिस्तानमधील क्रीडा प्रेमींसह जगभरातील लोकांची पसंती असते. आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये दोन वेळा आमनासामना झालाय. यामध्ये एक सामना भारताने जिंकला तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने बाजी मारली. आशिया चषकात 28 ऑगस्ट रोजी झालेला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला सर्वाधिक लोकांनी पाहिल्याचं समोर आले आहे. या सामन्याने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. आतापर्यंत झालेल्या सर्व टी 20 सामन्यापैकी या सामन्याला सर्वाधिक लोकांनी पाहिलं आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात 28 ऑगस्ट रोजी झालेल्या सामन्याला तब्बल 1.33 कोटी क्रीडा चाहत्यांनी पाहिलं आहे. तसेच हा सामना 13.6 अब्ज मिनिटं पाहिला गेल्याची नोंद झाली आहे. 2016 मध्ये आशिया चषकात झालेल्या भारत आणि पाकिस्तान या सामन्यापेक्षा तब्बल 30 टक्के जास्त चाहत्यांनी हा सामना पाहिलाय. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला मिळालेल्या प्रतिसादाबाबत डिस्नी स्टारचे प्रमुख संजोग गुप्ता यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच विश्वचषकाआधी क्रीडा चाहत्यांचा प्रतिसाद पाहाता पुढील काही दिवसांत होणाऱ्या सामन्यांना चांगला प्रतिसाद मिळेल, अशी आपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच प्रेक्षकांना खेचण्यासाठी आम्ही विविध प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितलं. विश्वचषकाआधी भारत मायदेशात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्याशी दोन हात करणार आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये सामना पार पडला. या स्टेडिअमची मर्यादा 25 हजार प्रेक्षक बसण्याची आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत पाहण्यासाठी स्टेडिअम प्रेक्षकांनी खचाखच भरले होते. 28 ऑगस्ट झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव करत आशिया चषकाची विजयी सुरुवात केली होती. पण त्यानंतर सुपर 4 स्पर्धेत भारतीय संघाला लागोपाठ दोन पराभवाचा सामना करावा लागला. श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्याकडून पराभव झाल्यामुळे भारतीय संघाचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. आज भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये आशिया चषकातील औपचारिक सामना होणार आहे.
आणखी वाचा :
आशिया चषकाला गालबोट, पाकिस्तानच्या असिफ अलीनं अफगाणिस्तानच्या खेळाडूवर उगरली बॅट, व्हिडीओ व्हायरल
Asia Cup 2022 : धक्कादायक! भारत आणि अफगाणिस्तान सामन्यापूर्वी दुबई स्टेडिअमबाहेर आगीची घटना