Virat Kohli Century : विराट कोहलीनं तब्बल दोन वर्ष आणि 10 महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावलं आहे. त्यानं ट्वेन्टी ट्वेन्टी आशिया चषकात अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावलं आहे. विराट कोहलीचं ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटमधलं हे पहिलंच आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं 71वं शतक ठरलं. त्यानं 61 चेंडूंत 12 चौकार आणि सहा षटकारांसह नाबाद 122 धावांची खेळी उभारली. विराटच्या या नाबाद शतकाच्या जोरावर टीम इंडियानं सुपर फोर सामन्यात अफगाणिस्तानला विजयासाठी 213 धावांचं आव्हान दिलं आहे. टीम इंडियानं या सामन्यात वीस षटकांत दोन बाद 212 धावांची मजल मारली. लोकेश राहुल आणि विराट कोहलीनं 119 धावांची सलामी देऊन भारतीय डावाचा पाया रचला. त्यात राहुलचा वाटा 41 चेंडूंमधल्या 62 धावांचा होता. त्यानं ही खेळी सहा चौकार आणि दोन षटकारांनी सजवली.


विराट कोहलीनं तब्बल एक हजार 21 दिवसानंतर आंतरराष्ट्रीय शतक झळकावलं आहे. याआधी विराट कोहलीनं नोव्हेंबर 2019 मध्ये शतकी खेळी केली होती. विराट कोहलीच्या शतकी खेळीनंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडला आहे. विराट कोहलीच्या चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. विराट कोहली सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. एका युजर्सनं विराट कोहलीनं शतक लगावल्यानंतर ट्वीट करत म्हटले की, शतक झळकावल्यानंतर विराट कोहलीचा चेहरा पाहण्यासारखा होता. खूप मस्त... दमदार फलंदाजी... अन्य एका युजर्सने म्हटले की, आशिया चषकातील विराटचं शतक भारतासाठी सकारात्मक बाब आहे. किंग कोहलीचं 71 शतक....  


























आशिया चषकात विराट कोहलीनं धावांचा पाऊस पाडला. श्रीलंकेविरोधातील सामन्याचा अपवाद वगळता विराट कोहलीनं आपल्या फलंदाजीनं सर्वांना प्रभावित केलेय. विराट कोहलीनं आशिया चषकात एका शतकासह दोन अर्धशतकं झळकावत सर्वाधिक धावा काढणाऱ्या फंलदाजामध्ये स्थान पटकावलं आहे. विराट कोहलीनं पाकिस्तानविरोधात निर्णायाक 60 धावांची खेळी केली होती. त्यानंतर आता अफगाणिस्तानविरोधात विराट कोहलीनं शतक झळकावलं आहे. विराट कोहलीचं टी 20 क्रिकेटमधील पहिलं शतक होय. याआधी विराट कोहलीनं कसोटी, एकदिवसीय आणि आयपीएलमध्ये शतक झळकावलं आहे. पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये टी 20 विश्वचषक होणार आहे. त्यापूर्वी विराट कोहलीचा फॉर्म भारतासाठी आनंदाची गोष्ट ठरली आहे. अनेकांनी विराट कोहलीच्या फॉर्मवर चिंता व्यक्त केली होती. मात्र, विराट कोहलीनं सर्वांना आपल्या कामगिरीतून उत्तर दिलं आहे. 


विराट कोहलीनं अफगाणिस्तान विरोधात वादळी शतकी खेळी केली. विराट कोहलीच्या नाबाद 122 धावांच्या खेळीच्या बळावर भारतानं निर्धारित 20 षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात 212 धावांचा डोंगर उभा केला. विराट कोहलीनं 61 चेंडूमध्ये 122 धावांचा पाऊस पाडला. या खेळीदरम्यान विराट कोहलीनं सहा षटकार आणि 12 चौकारांचा पाऊस पाडला. विराट कोहलीशिवाय केएल राहुलनं अर्धशतकी खेळी केली.