IND vs AFG Asia Cup: आशिया चषकातील अखेरच्या सामन्यातही भारतीय संघाने नाणेफेक गमावली आहे. सुपर 4 च्या तिन्ही सामन्यात भारताने नाणेफेक गमावली आहे. अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबी याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतीय संघ प्रथम फंलदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. भारत आणि अफगाणिस्तान संघाला सुपर 4 च्या आपल्या दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे दोन्ही संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे. दोन्ही संघ शेवट गोड कऱण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील.
भारतीय संघानं कर्णधार रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, युजवेंद्र चहल यांना आराम दिला आहे. केएल राहुलकडे संघाची जबाबदारी सोपण्यात आली आहे. दीपक चाहर, अक्षर पटेल आणि दिनेश कार्तिक यांना संघात स्थान देण्यात आले आहे.
भारताची प्लेईंग 11 -
लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ॠषभ पंत, दीपक हूडा, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, दीपक चाहर, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह
अफगाणिस्तानची प्लेईंग 11
हजरतुल्ला झझाई, रहमानुल्ला गुरबज, इब्राहिम झद्रान, करीम जनत, नजीबुल्लाह जद्रान, मोहम्मद नबी, रशीद खान, अझमतुल्ला ओमरझाई, फरीद अहमद, मुजीब उर रहमान, फजल हक
भारताचा अष्टपैलू हार्दिक पंडय़ाला आपल्या कामगिरीत सातत्य राखता आले नाही. पाकिस्तानविरोधात पहिल्या सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या हार्दिकला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले. त्याशिवाय सूर्यकुमार यादव, राहुल, दीपक हुडा आणि ऋषभ पंत यांनाही आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. या सर्वांना आपल्या कामगिरीत सुधारणा करण्याची गरज आहे. आशिया चषकात अफगाणिस्तानचा युवा रहमनुल्ला गुरबाझने आपल्या फलंदाजीनं सर्वांनाच प्रभावित केले आहे. त्याला रोखण्याचे भारतीय गोलंदाजांपुढे आव्हान असेल. मधल्या फळीत नजीबुल्ला आणि इब्राहिम झादरान यांचे योगदान महत्त्वाचे ठरेल. गोलंदाजीची मदार रशीद खान, मुजीब उर रहमान या फिरकीपटूंसह डावखुरा वेगवान गोलंदाज फझलहक फरूकी यांच्यावर असेल.