Asia Cup 2022, IND vs SL: रोहित शर्माच्या विस्फोटक अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 8 गड्यांच्या मोबदल्यात 173 धावा केल्या आहेत. श्रीलंकेला विजयासाठी 174 धावांची गरज आहे. आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर अश्विनने सात चेंडू 15 धावांची खेळी करत भारताची धावसंख्या 170 पार पोहचवली.
रोहित शर्माची विस्फोटक फलंदाजी -
केएल राहुल आणि विराट कोहली स्वस्तात माघारी परतल्यानंतर रोहित शर्मानं भारताचा डाव सावरला. रोहित शर्मानं सूर्यकुमार यादवसोबत भारतीय संघाची धावसंख्या वाढवली. रोहित शर्मानं 41 चेंडूत 72 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान रोहित शर्मानं चार षटकार आणि पाच चौकार लगावले. रोहित शर्मानं सूर्यकुमार यादवसोबत 58 चेंडूत 97 धावांची भागिदारी केली. रोहित-शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्या फलंदाजीमुळे भारताचा डाव सावरला.
सूर्यकुमार यादवची छोटेखानी खेळी -
दोन विकेट लागोपाठ पडल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा यांनी भारताचा डाव सावरला. सूर्यकुमार यादवनं रोहित शर्माला मोलाची साथ दिली. सूर्यकुमार यादवनं 34 धावांची छोटेखानी खेळी केली. या खेळीदरम्यान सूर्यकुमारनं एक चौकार आणि एक षटकार लगावला.
फलंदाजांचा पुन्हा फ्लॉप शो -
रोहित शर्मानं विस्फोटक फलंदाजी करत डाव सावरल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांनी निराशा केल्यामुळे भारतीय संघाचा डाव कोसळला. राहुल 6, विराट कोहली 0, हार्दिक पांड्या 17, ऋषभ पंत 17 आणि दीपक हुडा 3 धावा काढून बाद झाले. ठराविक अंतराने विकेट पडल्यामुळे भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले.
विराट कोहली गोल्डन डकचा शिकार -
आशिया चषकातील करो या मरो लढतीत टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली शून्यावर बाद झाला. विशेष म्हणजे, आशिया चषकाच्या इतिहासात विराट कोहली पहिल्यांदाच शून्यावर बाद झालाय. विराट कोहलीनं तीन सामन्यात 155 धावांचा पाऊस पाडला होता. पाकिस्तानविरोधात नुकत्याच झालेल्या सामन्यात विराट कोहलीनं दमदार अर्धशतक झळकावलं होतं. तुफान फॉर्ममध्ये असणाऱ्या विराट कोहलीला दिलशान मदुशंकानं त्रिफाळाचित बाद करत श्रीलंकेला मोठं यश मिळवून दिलं.
राहुलचा पुन्हा फ्लॉप शो -
दुखापतीनंतर भारतीय संघात स्थान मिळवणाऱ्या राहुलला आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आलेली नाही. राहुलला आतापर्यंत एकाही सामन्यात अर्धशतकी खेळी करता आली नाही. राहुलचा फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय ठरला आहे.
भारताने नाणेफेक गमावली -
मोक्याच्या सामन्यात रोहित शर्मानं नाणेफेकीचा कौल गमावला. श्रीलंकेचा कर्णधार दासुन शानाकाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. करो या मरोच्या सामन्यात भारतीय संघामध्ये एक बदल करण्यात आला. रवी बिश्नोईच्या जागी आर अश्विनला संधात स्थान देण्यात आले आहे. श्रीलंकेच्या संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, मागील सामन्यातील विजयी संघ कायम ठेवण्यात आला आहे.