India Vs Sri Lanka : आशिया चषक 2022 च्या सुपर 4 सामन्यात पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारताला पुढील दोन्ही सामन्यात विजय मिळवणं अनिवार्य आहे. अन्यथा भारताला आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडावं लागणार आहे. आज भारताचा सामना श्रीलंकेशी होणार आहे. करो या मरोच्या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये बदल होण्याची शक्यता आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, श्रीलंकाविरोधात अनुभवी दिनेश कार्तिकला (Dinesh Karthik) संधी मिळण्याची शक्यता आहे. तर ऋषभ पंतला (Rishabh Pant)  संघातील स्थान गमवावे लागू शकते. पाकिस्तानविरोधात ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) शॉट सिलेक्शनवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. याचा फटका पंतला बसण्याची शक्यता आहे. 


माजी क्रिकेटपटू वसीम अक्रम, गौतम गंभीर आणि रवी शास्त्री यांनी ऋषभ पंतच्या शॉट सिलेक्शनवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ऋषभ पंत दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पाकिस्तानविरोधात महत्वाच्या क्षणी बाद झाला. शादाब खानच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्वीप मारुन बाद होण्यापूर्वी पंतने 12 चेंडूत 14 धावांची खेळी केली होती. पंतने चुकीचा फटका मारत मोक्याच्या क्षणी विकेट फेकल्यामुळे सोशल मीडियावर चर्चा सुरु होती. त्याच्यावर अनेकांनी टीका केली होती. माजी क्रिकेटपटूंनींही त्याच्या शॉट सिलेक्शनवर प्रश्न उपस्थित केले. 


पाकिस्तानविरोधात पंत बाद झाल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये पंत बाद होऊन ड्रेसिंग रुमकडे जाताना कर्णधार रोहित शर्मानं शॉटचं कारण विचारल्याचं दिसतं. पंतने रोहित शर्माला शॉट खेळण्याचं कारण सांगितल्याचेही त्या व्हिडीओत दिसत आहे. 


गंभीर काय म्हणाला?
"ऋषभ पंत निराश असेल, कारण त्याचा हा शॉट नाही.  तो लॉन्ग-ऑन या डीप मिड-विकेट वर मारतो. पण महत्वाच्या सामन्यात चुकीचा फटका मारत विकेट फेकली.  पंतची ताकद रिव्हर्स-स्वीप नाही.  


वसिम अक्रम काय म्हणाला?
वसिम अक्रमने गौतम गंभीरच्या वक्तव्याचं समर्थन करत पंतवर निशाणा साधला. मोक्याच्या क्षणी पंतला असा फटका खेळण्याची गरज नव्हती, असे अक्रम म्हणाला. 


दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पंतने 50 पेक्षा जस्त सामने खेळले आहे. त्यानंतरही चुकीचा फटका मारुन वारंवार बाद झाल्याचं दिसत आहे. मोक्याच्या क्षणी विकेट फेकल्यामुळे संघावर दडपण निर्माण होते. अशात श्रीलंकाविरोधात होणाऱ्या सामन्यात पंतचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. पंतच्या जागी दिनेश कार्तिकला संघात स्थान मिळू शकतं.