Sachin Tendulkar On India vs Pakistan Match: दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर काल खेळण्यात आलेल्या आशिया चषकातील (Asia Cup 2022) दुसऱ्या सामन्यात भारतानं पाकिस्तानवर (India vs Pakistan) पाच विकेट्सनं दणदणीत विजय मिळवला. ज्यामुळं संपूर्ण देशभरातून भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव केला जातोय. दरम्यान, भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) भारतीय खेळाडूंचं कौतुक केलंय. तसेच वेगवान गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळंच भारताला पाकिस्तानविरुद्ध यश मिळालंय, असं सचिन तेंडुलकरचं मत आहे.
पाकिस्तानविरुद्ध सामन्यात वेगवान गोलंदाजांनी सर्व 10 विकेट्स घेतल्या आहेत. सचिन तेंडुलकर म्हणाला की, "पाकिस्तानविरुद्ध विजयाचं श्रेय वेगवान गोलंदाजांना जातंय. या सामन्यात आमचे वेगवान गोलंदाज दबाव निर्माण करण्यात यशस्वी झाले. पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनीही चांगली गोलंदाजी केली." याशिवाय सचिन तेंडुलकरनं हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) फलंदाजीचंही कौतूक केलं. "हार्दिक पांड्याची खेळी खूप महत्त्वाची होती. तो शेवटपर्यंत राहिला आणि संघाला विजय मिळवून दिल्यानंतरच परतला. विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांची फलंदाजीही उत्कृष्ट होती. या विजयासाठी टीम इंडियाचे अभिनंदन."
भारताचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय योग्य ठरला
पाकिस्तान विरुद्ध खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माचा हा निर्णय गोलंदाजांनी योग्य ठरवला. भुवनेश्वर कुमारनं बाबर आझमला 10 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परत पाठवलं. यानंतर पाकिस्तान संघाला सामन्यात पुनरागमन करता आलं नाही. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवाननं एकाकी झुंज दिली. या सामन्यात त्यानं पाकिस्तानकडून सर्वाधिक 43 धावांची खेळी केली.
भारताचा पुढील फेरीतील प्रवेश निश्चित
भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पांड्याच्या भेदक गोलंदाजीसमोर पाकिस्तानचा संघाची दमछाक झाली. भारतानं 147 धावांवर पाकिस्तानला ऑलआऊट केलं. मात्र, या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची दमछाक झाली. पण अखेरीस हार्दिक पांड्याच्या दमदार खेळीच्या जोरावर भारतानं 19.4 षटकांत 5 विकेट गमावून 148 धावांचं लक्ष्य पूर्ण करत विजय मिळवला. या विजयासह भारताचा पुढील फेरीत प्रवेश निश्चित आहे.
हे देखील वाचा-