या स्पर्धेत भारताचा सलामीचा सामना मंगळवार, 18 सप्टेंबरला हाँगकाँगशी होत आहे. त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवार 19 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान संघ आमनेसामने येतील. टीम इंडियाचा नियमित कर्णधार विराट कोहलीला आशिया चषकातून विश्रांती देण्यात आली आहे. विराटच्या अनुपस्थितीत टीम इंडिया आशिया चषक जिंकणार का, याविषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.
वाचा - आशिया चषकात टीम इंडियाची धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर
महामुकाबला
रोहित शर्माची टीम इंडिया आणि सर्फराज अहमदची पाकिस्तान आर्मी याच महामुकाबल्याचं आकर्षण घेऊन, सुरुवात होत आहे आशिया चषकाच्या महासंग्रामाला. दुबई आणि अबूधाबी या दोन शहरांमध्ये आशिया चषकाच्या सामन्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. भारतासह श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग हे सहा संघ आशिया चषकाच्या रणांगणात आमनेसामने येणार आहेत.
अ आणि ब गटात विभागणी
आशिया चषकातल्या सहा संघांची अ आणि ब अशा दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. त्यापैकी भारत, पाकिस्तान आणि हाँगकाँग या तीन संघांचा समावेश अ गटात करण्यात आला आहे. श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश हे तीन संघ ब गटात असतील. गटवार साखळी सामन्यांनंतर प्रत्येक गटातून दोन अव्वल संघ हे सुपर फोर लढतींसाठी पात्र ठरतील सुपर फोरच्या अव्वल साखळीतून सर्वोत्तम दोन संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील.
भारताचं वर्चस्व
आजवरच्या इतिहासात आशिया चषकावर भारतानं आपलं वर्चस्व राखलं आहे. आजवरच्या तेरापैकी सहा आशिया चषकांत भारतानं विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. 2016 सालच्या आशिया चषकात भारतानं बांगलादेशवर आठ विकेट्सनी मात करत विजेतेपद पटकावलं होतं. त्यामुळं टीम इंडियाच्या शिलेदारांसमोर गतविजेतेपदाचा लौकिक कायम राखण्याचं आव्हान असेल.
भारत-पाकिस्तान तुल्यबळ लढत
भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक संघांमधली तुल्यबळ लढत हे यंदाच्या आशिया चषकाचं मुख्य आकर्षण आहे. गेल्या वर्षीच्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये टीम इंडियाला पाकिस्तानकडून लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला होता. त्या पराभवाचं उट्टं काढण्याची संधी टीम इंडियाला आशिया चषकात मिळणार आहे. आशिया चषकाच्या गटवार साखळीत आणि अव्वल साखळीत मिळून किमान दोनवेळा भारत आणि पाकिस्तान संघ एकमेकांना भिडणार आहेत. आणि योगायोगानं त्याच दोन संघांनी अंतिम फेरीत धडक मारली, तर आशिया चषकात भारत-पाकिस्तान सामना तिसऱ्यांदा पाहायला मिळण्याची चिन्हं आहेत. याच पार्श्वभूमीवर बीसीसीआयनं टीम इंडियाचा नियमित कर्णधार विराट कोहलीला दिलेली विश्रांती आश्चर्याचा धक्का देणारी ठरली आहे.
आता विराट कोहलीच्या अनुपस्थितीत बदली कर्णधार रोहित शर्मा आणि त्याचे शिलेदार आशिया चषकात कशी कामगिरी करतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरलं आहे.
आशिया चषकासाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), लोकेश राहुल, अंबाती रायुडू, मनीष पांडे, केदार जाधव, महेंद्रसिंह धोनी, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, शार्दुल ठाकूर आणि खलील अहमद
Asia Cup 2018 Date and Time आशिया चषक वेळापत्रक
साखळी फेरी-
15 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध श्रीलंका – दुबई
16 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध हाँगकाँग – दुबई
17 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान – अबु धाबी
18 सप्टेंबर – भारत विरुद्ध हाँगकाँग – दुबई
1 9 सप्टेंबर – भारत विरुद्ध पाकिस्तान – दुबई
20 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान – अबु धाबी
सुपर फोर –
21 सप्टेंबर – गट अ विजेता विरुद्ध ब गट उपविजेता – दुबई
21 सप्टेंबर – गट ब विजेता विरुद्ध अ गट उपविजेता – अबु धाबी
23 सप्टेंबर – गट अ विजेता विरुद्ध अ गट उपविजेता – दुबई
23 सप्टेंबर – ब गट विजेता विरुद्ध ब गट उपविजेता – अबु धाबी
25 सप्टेंबर – गट अ विजेता विरुद्ध गट ब विजेता – दुबई
26 सप्टेंबर – अ गट उपविजेता विरुद्ध ब गट उपविजेता – अबु धाबी
अंतिम सामना-
28 सप्टेंबर – आशिया चषक 2018 अंतिम सामना – दुबई
संबंधित बातम्या