ओव्हरहेड वायर दुरुस्त करणारी व्हॅन रात्रीच्या सुमारास कसारा रेल्वे स्थानकाच्या पुढे दुरुस्ती करत होती. मात्र ही बाब सिग्नल कंट्रोलरच्या लक्षात आली नाही आणि त्याने मागून मुंबईकडे जाणाऱ्या मालगाडीला सिग्नल दिला. वेगात येणाऱ्या मालगाडीच्या चालकाला सुदैवाने ही व्हॅन दिसल्याने त्याने वेग कमी केला, मात्र गाडी पूर्ण थांबली नाही आणि मालगाडीने या ओव्हरहेड वायर दुरुस्त करणाऱ्या व्हॅनला धडक दिली. यात ओव्हरहेड वायर दुरुस्त करणारी व्हॅन रुळाखाली घसरली.
सध्या दुरुस्तीचं काम सुरु आहे. परंतु याचा परिणाम कसाऱ्यावरुन येणाऱ्या वाहतुकीवर झाला आहे. कसाऱ्यावरुन सकाळपासून एकही लोकल सुटलेली नाही. परिणामी कसारा ते आसनगाव दरम्यानची वाहतूक ठप्प झाली आहे. तर लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे.
मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या अनेक गाड्याही अडकल्या आहेत. पहाटेच्या सुमारास उत्तर महाराष्ट्र, विदर्भातून अनेक एक्स्प्रेस मुंबईला येतात या सर्व गाड्या अडकल्या. तर डाऊन मार्गावरुन मुंबईकडे येणाऱ्या एक्स्प्रेस सोडल्या जात आहेत, मात्र तरीही इगतपुरीपर्यंत एक्स्प्रेसची रांग लागल्याने वेळापत्रक पूर्णत: विस्कळीत झालं आहे.
तर वाशिंद रेल्वे स्थानकातील रेलरोको प्रवाशांनी मागे घेतला असून रोखून धरलेली एक्स्प्रेस सोडली आहे.
अडकलेल्या एक्स्प्रेस
11062 दरभंगा एलटीटी पवन एक्स्प्रेस
11058 अमृतसर मुंबई एक्स्प्रेस
11016 गोरखपूर एलटीटी कुशीनगर एक्स्प्रेस
18030 शालिमार एलटीटी एक्स्प्रेस
12810 हावडा मुंबई मेल (व्हाया नागपूर)
11402 नागपूर मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस
12112 अमरावती मुंबई एक्स्प्रेस
12106 गोंदिया मुंबई विदर्भ एक्स्प्रेस
12138 फिरोजपूर मुंबई पंजाब मेल
17058 सिकंदराबाद मुंबई देवगिरी एक्स्प्रेस
11025 भुसावळ पुणे एक्स्प्रेस
12618 मंगला लक्षद्वीप एक्स्प्रेस
22102 मनमाड मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस
वाहतूक पूर्वपदावर येण्यास तीन तास लागणार : मध्य रेल्वे
दरम्यान, लोकल वाहतूक पूर्वपदावर येण्यासाठी आणखी दोन ते तीन तास लागणार असल्याची माहिती मध्य रेल्वेतर्फे देण्यात आली आहे. "वाशिंदमध्ये प्रवाशांच्या आंदोलनामुळे लोकल वाहतूक केवळ टिटवाळ्यापर्यंत सुरु आहे. कसारा ते टिटवाळादरम्यान वाहतूक विस्कळीत आहे. प्रवाशांना आंदोलन थांबवावं, असं आवाहन आम्ही करतो. आंदोलनामुळे दुरुस्तीच्या कामाला आता 10 ते 11 वाजू शकतात," असं मध्य रेल्वेने ट्वीटमध्ये सांगितलं आहे.