विजय मल्या आणि अरुण जेटली यांच्या कथित भेटीवर ललित मोदी म्हणाले की, "तिथे असलेले लोकांना माहित आहे की, जेटलींनी मल्ल्याची भेट घेतली होती, तर ते हे वृत्त का फेटाळत आहेत? अरुण जेटली यांना खोटं बोलण्याची सवय आहे. तुम्ही एका सापाकडून (सापाचं चिन्ह) आणखी काय अपेक्षा ठेवू शकता." त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये अरुण जेटली आणि विजय मल्ल्या यांनाही टॅग केलं आहे.
आयपीएलचे माजी कमिशनर ललित मोदी यांच्यावर आयपीएल लिलावात लाच घेण्याचा, मनी लॉन्ड्रिंगचा आरोप आहे. 2010 पासून ते भारतातून फरार आहे आणि ते लंडनमध्ये असल्याचं वृत्त आहे.
भारत सोडण्यापूर्वी जेटलींना भेटलो : मल्ल्या
देश सोडण्याआधी मी अर्थमंत्री अरुण जेटलींसमोर सेटलमेंटसाठी प्रस्ताव ठेवला होता, असा खळबळजनक दावा कर्जबुडव्या विजय मल्ल्या याने केला आहे. तसेच, लंडनला जाण्यापूर्वी जेटलींना मी भेटलोही होतो, असंही मल्ल्या म्हणाला. भारतातील बँकांना 9 हजार कोटींचा चुना लावून, 2 मार्च 2016 रोजी विजय मल्ल्या भारताबाहेर फरार झाला. त्यानंतर भारताने त्याच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटनकडे मागणी केली. त्याबाबत लंडनमधील वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात झालेल्या सुनावणीवेळी मल्ल्याने हा गौप्यस्फोट केला.
अरुण जेटलींचं स्पष्टीकरण
कर्जबुडव्या विजय मल्ल्याने देश सोडण्याआधी अर्थमंत्री जेटलींना भेटल्याचे सांगितल्यानंतर, तातडीने अर्थमंत्री अरुण जेटलींनी पत्रक काढून स्पष्टीकरण दिले. जेटली म्हणाले, "मला भेटून सेटलमेंटची ऑफर दिली, हे विजय मल्ल्या यांचे विधान पूर्णपणे चुकीचं असून, सत्य दर्शवत नाही. 2014 पासून विजय मल्ल्या यांना भेटण्याची वेळ दिली नाही. त्यामुळे त्यांना भेटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही."
अरुण जेटलींनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि कर्जबुडव्या विजय मल्ल्या यांच्या भेटीनंतर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत अरुण जेटली यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या पत्रकार परिषदेला राहुल गांधींसह पी एल पुनिया हे उपस्थित होते. पुनिया यांनी स्वत: जेटली आणि विजय मल्ल्या यांची भेट झाल्याचं पाहिलं होतं असा दावा केला. 1 मार्च 2016 रोजी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये जेटली-मल्ल्या यांची भेट झाली होती, असं पुनिया यांनी सांगितलं. त्यासाठी त्या दिवशीचं सीसीटीव्ही फुटेज तपासा असंही ते म्हणाले. 1 मार्चला या दोघांची भेट झाली त्यानंतर दोन मार्चला मल्ल्या पळून गेला, असा दावा राहुल गांधी यांनी केला.