Anil Kumble on Ajaz Patel: भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमध्ये सुरु आहे. या सामन्यात भारताच्या पहिल्या डावात न्यूझीलंडच्या एजाज पटेलनं भारताचे सर्व फलंदाज बाद करण्याचा विक्रम केला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या संपूर्ण भारतीय संघाला एकट्या एजाज पटेलनं माघारी धाडून मोठा विक्रम  आपल्या नावावर केला. मूळ मुंबईकर असलेल्या एजाजनं भारताचे माजी खेळाडू अनिल कुंबळे यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. एजाजच्या या विक्रमानंतर अनिल कुंबळे यांनी ट्वीट करत त्याचं अभिनंदन केलं आहे. 


कुंबळे यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की,  दहा विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या क्लबमध्ये स्वागत आहे. एजाज पटेलनं परफेक्ट गोलंदाजी केली असल्याचं कुंबळेंनी म्हटलंय. 


Welcome to the club #AjazPatel #Perfect10 Well bowled! A special effort to achieve it on Day1 & 2 of a test match. #INDvzNZ


— Anil Kumble (@anilkumble1074) December 4, 2021


एजाज पटेलची भेदक गोलंदाजी


एजाज पटेलच्या भेदक गोलंदाजीसमोर दिग्गज फलंदाज फेल ठरले. मयांक, अक्षर आणि शुभमन वगळता एकाही भारतीय फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. भारतीय फलंदाजाचा निभाव लागला नाही. एजाजने एक-एक भारताचे दहा विकेट्स घेतल तंबूत पाठवलं. या कामगिरीसह एजाज पटेलनं अनिल कुंबळेच्या विक्रमाशी बरोबरी केलीय. एजाज पटेलनं 47.5 षटकात 10 गडींना बाद केलंय. यात त्यानं 12 षटकं निर्धाव टाकलीत. तर 2.49 च्या सरासरीनं 119 धावा दिल्या आहेत. अनिल कुंबळेनं पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात एका इनिंगमध्ये 10 गडी बाद केले होते.


भारताकडून पहिल्या डावात मयांक अग्रवालनं शानदार दीडशतकी खेळी केली. मयांकशिवाय अक्षर पटेलनं 53 तर शुभमन गिलनं 44 धावा केल्या. भारताच्या सर्वच खेळाडूंना एजाजनं तंबूत पाठवलं. विशेष म्हणजे चार खेळाडूंना एजाजनं शून्यावर बाद केलं. यात विराट कोहली, चेतेश्वर पुजारा या दिग्गज फलंदाजांचा देखील समावेश आहे. 



भारत विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडकडून आक्रमक गोलंदाजी करणारा एजाज पटेलची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झालीय. तसेच भारतीय फलंदाजांची घसरगुंडी पाहता नेटकऱ्यांनी आता प्रशिक्षक राहुल द्रविडला फलंदाजीला येण्याचा सल्ला दिलाय. तर, काहीजणांकडून अनिल कुंबळे आणि एजाज पटेल यांची तुलना केली जात आहे. 


हे देखील वाचा-