मुंबई : दिवाळीच्या (Diwali) धामधूमीत एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), यांच्या भेटीची चर्चा आहे. दुसरीकडे भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) सेमी फायलनचा थरार सुरु आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार थेट वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) मॅच पाहण्यासाठी दाखल झाले. बारामतीतील भाऊबीज आटोपून अजित पवार मुंबईत दाखल झाले. मुंबईत दाखल होताच त्यांनी थेट वानखेडे मैदान गाठून भारत न्यूझीलंड सामन्याचा आनंद लुटला.
त्याआधी अजित पवार काटेवाडीतील निवासस्थानी भाऊबीज सोहळ्यासाठी उपस्थित होते. यावेळी संपूर्ण पवरा कुटुंब हजर होतं.अजित पवार, जय पवार, सुप्रिया सुळे, प्रतिभा पवार, पार्थ पवार, शर्मिला पवार, श्रीनिवास पवार, अजित पवारांच्या दोन बहिणी, रणजित पवार, जयंत पवार अजित पवारांच्या निवासस्थानी भाऊबीजेनिमित्त एकत्र आले होते.
शरद पवारांची उपस्थिती
यंदा पवार कुटुंबियांच्या भाऊबीजेकडे राज्याचं लक्ष आहे. भाऊबीजेनिमित्त शरद पवारांची काटेवाडीत हजेरी महत्वाची असणार होती. त्यामुळे संपूर्ण पवार कुटुंब एकत्र असताना आता शरद पवारांची प्रतीक्षा होती. अखेर शरद पवार अजित पवारांच्या निवासस्थानी पोहचले. यावेळी माजी मंत्री राजेश टोपेदेखील हजर होते.
राष्ट्रवादीतील फुटीनंतर पहिली दिवाळी
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पवार कुटुंबियांची ही पहिलीच दिवाळी आहे. त्यामुळे पवार कुटुंब दिवाळी नेमकी कशी साजरी करणार, याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलं होतं. दिवाळीत अजित पवार कुटुंबातील दिवाळीत सामील होणार का? असा प्रश्न पडला होता. मात्र पवारांची दिवाळी दरवर्षीप्रमाणेच साजरी होईल असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं होतं. त्यानुसार अजित पवार यांनी कुटुंबाच्या दिवाळी सेलिब्रेशनला हजेरी लावली होती.
सेलिब्रिटींची हजेरी
भारत न्यूझिलंड सेमीफायनलला (IND Vs NZ Semi-Final) अनेक सेलिब्रिटीज उपस्थित आहेत. इंग्लंडचा दिग्गज फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमचाही समावेश आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर प्रमाणेच बेकहॅम ही युनिसेफचा गुडविल अम्बेसेडर असून तो सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. यामुळे आजच्या सामन्याला तो वानखेडेवर उपस्थिती आहे. त्याचप्रमाणे गोल्डन पासधारक सुपरस्टार अभिनेते अमिताभ बच्चन आणि रजनीकांत हे दोघेही मॅच पाहण्यासाठी वानखेडे स्टेडिअमला असतील अशी माहिती आहे. जगज्जेत्या वेस्टइंडिज संघाचा माजी कर्णधार विविअन रिचर्डस्, अभिनेता सलमान खान (Salman Khan), आमिर खान (Aamir Khan), रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हे सेलिब्रिटी उपस्थित राहू शकतात.