इंडोनेशियन ओपन... ऑस्ट्रेलियन ओपन... डेन्मार्क ओपन... आणि आता फ्रेन्च ओपन सुपर सीरीजच्या या विजेतेपदानं किदम्बी श्रीकांतला थोरामोठ्यांच्या पंक्तीत नेऊन बसवलं आहे. एकाच मोसमात एकदोन नाही, तर चार-चार सुपर सीरीजची विजेतीपदं पटकावणारा किदम्बी श्रीकांत हा जगातला केवळ चौथा बॅडमिंटनवीर ठरला आहे.
जागतिक बॅडमिंटनच्या इतिहासात आजवर लिन डॅन, ली चॉन्ग वेई आणि चेन लॉन्ग या तिघांनीच एका मोसमात चार सुपर सीरीज जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता. भारताच्या किदम्बी श्रीकांतनं फ्रेन्च ओपन जिंकून त्या तिघांच्या पंक्तीत स्थान मिळवलं आहे. साहजिकच एक भारतीय बॅडमिंटनवीर या नात्यानं एकाच मोसमात सर्वाधिक सुपर सीरीज जिंकण्याचा पराक्रम श्रीकांतच्या नावावर जमा झाला. भारताची फुलराणी सायना नेहवालचा एकाच मोसमात सर्वाधिक तीन सुपर सीरीज जिंकण्याचा विक्रम त्यानं मोडीत काढला.
तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की, हा सुपर सीरीज प्रकार आहे तरी काय? मग ऐका... बॅडमिंटनच्या दुनियेत सुपर सीरीज प्रीमियर आणि सुपर सीरीज स्पर्धांना ऑलिम्पिक आणि जागतिक विजेतेपद स्पर्धेखालोखाल महत्त्व आहे. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनची खास मान्यता लाभलेल्या सुपर सीरीजचा दर्जा हा सर्वोच्च मानला जातो. बॅडमिंटनच्या एका मोसमात किमान बारा-तेरा देशांमध्ये मिळून चौदा सुपर सीरीजचं आयोजन करण्यात येतं. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनचं प्रत्येक सुपर सीरीजवर बारीक लक्ष असतं. दर तीन वर्षांनी प्रत्येक सुपर सीरीजचा आढावा घेऊन त्याचं पुन्हा आयोजन व्हावं की, नाही याचा कठोर निर्णय फेडरेशन घेत असते. त्यामुळं सुपर सीरीजचा दर्जा टिकून राहतो. त्यामुळंच सुपर सीरीजच्या परिक्षेत एकाच मोसमात चार-चारवेळा सर्वोत्तम ठरणं हे तुम्ही चॅम्पियन असल्याचं दाखवून देतं. आणि किदम्बी श्रीकांत हा जागतिक बॅडमिंटनला मिळालेला नवा चॅम्पियन आहे.
सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधूच्या कामगिरीनं गेल्या पाच वर्षांत भारतीय बॅडमिंटनला जगात नवा आदर मिळवून दिला आहे. पण किदम्बी श्रीकांतनं यंदाच्या मोसमात बजावलेल्या कामगिरीनं भारतीय बॅडमिंटनविषयीचा आदर आणखी वाढला आहे. एका मोसमात चार सुपर सीरीज जिंकायच्या... त्यापैकी डेन्मार्क आणि फ्रेन्च ओपनचं विजेतेपद तर लागोपाठ दोन आठवड्यांत पटकावायचं हे श्रीकांत सुपर फॉर्ममध्ये असल्याचं लक्षण आहे. डेन्मार्क ओपन आणि फ्रेन्च ओपनच्या फायनलवर नजर टाकली तर त्याचा सुपर फॉर्म म्हणजे काय, याची कल्पना यावी. डेन्मार्क ओपनमध्ये त्यानं ली ह्यूनला २५ मिनिटांत गाशा गुंडाळायला लावला, तर फ्रेन्च ओपनमध्ये त्यानं केन्टा निशिमोटोचा ३५ मिनिटांत फडशा पाडला.
किदम्बी श्रीकांतच्या सुपर फॉर्मला त्याच्या सुपर फिटनेसचीही जोड लाभली आहे. दर दहा दिवसांनी जगातल्या एका नव्या शहरात लॅण्डिंग करून, सर्वोत्तम परफॉर्मन्स देण्याची सवय ही सुपरमॅनचीच असू शकते. म्हणूनच जाणकारांना त्यानं वयाच्या अवघ्या चोविसाव्या वर्षी बजावलेल्या कामगिरीचं कौतुक वाटतं. भारतीय बॅडमिंटननं याआधीही प्रकाश पडुकोण आणि पुलेला गोपीचंद यांच्यासारखे चॅम्पियन जगाला दिले आहेत. पण भारतीय बॅडमिंटनवीर हे तिशीच्या आसपास परिपक्व होत असल्याचा आजवरचा अनुभव होता. किदम्बी श्रीकांतनं मात्र पंचविशीच्या आतच घवघवीत यश मिळवून भारतीय बॅडमिंटनविषयीचं जगाचं कुतूहल वाढवलं आहे.
किदम्बी श्रीकांतच्या यंदाच्या मोसमातल्या पराक्रमानं जागतिक बॅडमिंटनमधली त्याची ओळखही बदलली आहे. यंदाच्या मोसमाआधी बॅडमिंटनच्या दुनियेत त्याची जायंटकिलर अशी ओळख होती. वर्ल्ड नंबर वन व्हिक्टर अॅक्सलसन असेल, ऑलिम्पिक चॅम्पियन चेन लॉन्ग असेल किंवा वर्ल्ड नंबर टू सॉन वॅन हो... त्यांच्यावर श्रीकांतनं मिळवलेला प्रत्येक विजय हा त्याच्या गुणवत्तेची केवळ झलक दाखवणाराच होता. पण यंदाच्या मोसमात चार सुपर सीरीजच्या विजेतीपदांनी किदम्बी श्रीकांतला सुपर चॅम्पियन म्हणून जगासमोर आणलं आहे.
एकाच मोसमात चार सुपरसीरिज खिशात, किदंबी श्रीकांतचं घवघवीत यश
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Oct 2017 11:42 PM (IST)
जागतिक बॅडमिंटनच्या इतिहासात आजवर लिन डॅन, ली चॉन्ग वेई आणि चेन लॉन्ग या तिघांनीच एका मोसमात चार सुपर सीरीज जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता. भारताच्या किदम्बी श्रीकांतनं फ्रेन्च ओपन जिंकून त्या तिघांच्या पंक्तीत स्थान मिळवलं आहे. साहजिकच एक भारतीय बॅडमिंटन
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -