बीडमधील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्री रोग आणि प्रसुती विभागात रविवारी रात्री 8.30 वाजता या बाळाचा जन्म झाला होता. या बाळाला जन्मतःच दोन तोंडं होती. बाळाची आई मूळ परळी तालुक्यातील आहे.
प्रसुती विभागातील सर्जन डॉ. संजय बनसोडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अवघड शस्त्रक्रियेद्वारे महिलेची प्रसुती केली.
बाळावर वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते.
एक शरीर, दोन तोंडं; बीडमध्ये सयामी जुळ्यांचा जन्म
तज्ञ डॉक्टरांनी या बाळाला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले, मात्र बाळाने उपचाराला प्रतिसाद दिला नाही. सोमवारी संध्याकाळी बाळाने अखेरचा श्वास घेतला.
रुग्णालयातील डॉक्टरांनी बाळ वैद्यकीय अभ्यासासाठी रुग्णालयाच्या शरीर रचनाशास्त्र विभागात ठेवण्याची विनंती केली होती. मात्र पालकांची मानसिकता याबाबत अनुकूल नसल्यामुळे त्यांच्या भावनांचा आदर राखत मृतदेह पालकांच्या ताब्यात देण्यात आला.
महिलेची आधीची कागदपत्रं तपासताना बाळामध्ये दोष असल्याचं लक्षात आलं होतं. त्यानंतर डॉक्टरांनी सिझेरियनद्वारे प्रसुती करण्याचा निर्णय घेतला. परंतु बाळाला बाहेर काढल्यानंतर त्याला दोन तोंड असल्याचं दिसलं होतं. जन्मावेळी बाळाचं वजन 3 किलो 700 ग्रॅम होतं.
एक शरीर आणि दोन तोंड असलेल्या बाळांना सयामी जुळेच म्हणतात. मात्र यात एका बाळाची संपूर्ण वाढ झाली होती, तर दुसऱ्या बाळाचं तोंड, छाती आणि पोटाकडचा भाग पहिल्या बाळाला जोडला गेला होता.
या बाळाला दोन डोकं, दोन किडनी आणि दोन फुफ्फुसं होती. मात्र इतर अवयव एकच होते. महिलेचं हे पाचवं अपत्य होतं. याआधी तिला तीन मुली आणि एक मुलगा आहे.