मुंबई : मलबार हिलमधील रहिवाश्यांचा विरोध डावलून प्रियदर्शनी पार्कमध्ये फायर ब्रिगेड स्थानक उभारण्याचा प्रयत्न करु पाहणाऱ्या महापालिका प्रशासनाला मुंबई हायकोर्टानं चांगलंच धारेवर धरलं आहे. मुंबईच्या रस्त्यांवर खड्यांचं साम्राज्य वाढतंय, रस्ते अपघातात लोकांचे जीव जातायत आणि तुम्हाला फायर ब्रिगेडची पडली आहे? असा सवाल कोर्टाने केला आहे.

आधी इतर समस्यांकडे गांभीर्यानं पाहा, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयानं महानगरपालिकेला खडसावलं आहे. पालिकेच्या वतीनं उभारण्यात आलेलं तात्पुरतं अग्निशमन केंद्र ताबडतोब हटवण्याचे निर्देश हायकोर्टानं दिले आहेत.

19 जून 2017 रोजीच हे केंद्र हटवण्याचे निर्देश हायकोर्टानं दिले असतानाही ते अजून पूर्ण का केले नाहीत? असा सवाल करत हायकोर्टानं मंगळवारी सकाळी 11 वाजेपर्यंत तात्पुरतं अग्निशमन केंद्र हटवण्याचे आदेश दिले. बुधवारी मलबार हिल रहिवाशी संघटनेच्या वतीनं दाखल याचिकेवर पुन्हा सुनावणी होणार आहे.

फायर ब्रिगेडमुळे प्रियदर्शनी पार्कमध्ये जॉगिंगला येणाऱ्या रहिवाश्यांना त्रास होत असल्याचं सांगत स्थानिक रहिवाशी संघटनेनं याविरोधात हायकोर्टात धाव घेतली होती.

प्रियदर्शनी पार्कचा भूखंड हा फायर ब्रिगेडसाठी राखीव आहे, असा दावा करत पालिकेनं तिथं उभारण्यात आलेला जॉगिंग ट्रॅक हा बेकायदेशीर असल्याचा आरोप हायकोर्टात केला होता. तसंच 14 जून 2017 ला तात्पुरतं अग्निशमन केंद्र उभारल्यापासून तिथं 29 कॉल्स घेण्यात आले आहेत.

नियमानुसार 50 हजार लोकसंख्या असलेल्या विभागात स्वतंत्र अग्निशमन केंद्र असणं आवश्यक आहे. याआधी मलबार हिल परिसरात नाना चौकातून अग्निशमन सेवा पुरवली जायची. मात्र ट्राफिकमुळे घटनास्थळी तात्काळ पोहचणं कठीण जायचं. त्यामुळे प्रियदर्शनी पार्क इथं एक छोटेखानी अग्निशमन केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी भूमिका पालिकेनं हायकोर्टात मांडली.