डर्बन : भारताविरुद्धच्या वन डे मालिकेपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे. स्टार फलंदाज एबी डिव्हिलियर्सला दुखापतीमुळे पहिल्या तीन वन डे सामन्यांना मुकावं लागणार आहे. कसोटी मालिका जिंकणाऱ्या दक्षिण आफ्रिकेसाठी हा मोठा धक्का आहे.
दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने डिव्हिलियर्सच्या जागी कोणत्याही खेळाडूची निवड केलेली नाही. म्हणजेच पहिल्या तीन वन डेमध्ये दक्षिण आफ्रिका 14 खेळाडूंसोबतच मैदानात उतरणार आहे. उर्वरित तीन वन डे सामन्यांमध्ये डिव्हिलियर्सचं पुनरागमन होऊ शकतं.
10 फेब्रुवारी रोजी वाँडरर्समध्ये होणाऱ्या वन डे सामन्यापूर्वी डिव्हिलियर्स दुखापतीतून सावरलेला असेल, असा दक्षिण आफ्रिकेच्या मेडिकल टीमला विश्वास आहे.
भारताविरुद्ध खेळताना डिव्हिलियर्सची कामगिरी नेहमीच चांगली राहिली आहे. त्याने भारताविरुद्ध 29 इनिंगमध्ये 51.80 च्या सरासरीने 1295 धावा काढल्या आहेत. यामध्ये 6 शतकं आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सहा सामन्यांच्या वन डे मालिकेतील सामना 1 फेब्रुवारी रोजी डर्बनमध्ये खेळवला जाणार आहे. कसोटी मालिकेत पराभवाचा सामना करावा लागलेली टीम इंडिया नव्या जोमाने या मालिकेसाठी मैदानात उतरणार आहे.
दक्षिण आफ्रिकेचा वन डे संघ :
फाफ डू प्लेसिस, हाशिम आमला, क्विंटन डी कॉक, जेपी ड्युमिनी, इम्रान ताहिर, एडेन मार्कम, डेव्हिड मिलर, मॉर्न मॉर्केल, ख्रिस मॉरिस, लुंगिसानी एनगिडी, एंडील फहलुकवेयो, कागिसो रबाडा, तबरेज शम्सी, खॅलीहले जोडो