मुंबई: ऑनलाईन कर्जमाफीच्या घोळानंतर अखेर सरकारला जाग आली. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी कर्जमाफीचा लाभ प्रलंबित असणाऱ्या शेतकऱ्यांना बँकेशी संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे.


ज्या शेतकऱ्यांची ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती आणि बँकांची दिलेली माहिती जुळत नाही अशा शेतकऱ्यांनी माहितीची शहानिशा करण्यासाठी बँकांशी संपर्क साधण्याचं आवाहन देशमुख यांनी केलं आहे.

छत्रपती शिवाजीमहाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत पात्र अर्जदार शेतकऱ्यांना बँकांकडील माहितीच्या आधारे कर्जमाफीचा आणि प्रोत्साहनपर लाभाचा फायदा देण्यात आला आहे.

काही शेतकऱ्यांनी त्यांच्या अर्जात दिलेली कर्जाची माहिती ही बँकेकडून प्राप्त झालेल्या कर्ज खात्यांच्या माहितीशी जुळत नसल्याने अशा शेतकऱ्यांना लाभ मिळू शकला नाही. अर्जदार शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीची शहानिशा करुन पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ देता यावा, म्हणून शासनाने तालुकास्तरीय समिती गठित केली आहे. अशा शेतकऱ्यांच्या याद्या संबंधित बँकेत उपलब्ध करुन दिलेल्या आहेत आणि बँकांनी त्यांच्या शाखेत त्या याद्या प्रसिद्ध केलेल्या आहेत.

कर्जमाफी योजनेचा लाभ प्रलंबित असलेल्या अर्जदार शेतकऱ्यांनी आपल्या कर्ज खात्याची अचूक माहिती आपल्या बँकेच्या शाखेत त्वरीत सादर करावी. शेतकऱ्यांसंबंधी माहितीची शहानिशा करुन त्यामध्ये आवश्यक ती दुरुस्ती बँकेमार्फत करण्यात येईल. त्यानंतर तालुकास्तरीय समिती मार्फत तपासणी अंती ही माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात येऊन, योजनेंतर्गत लाभ देण्याबाबत आवश्यक ती कारवाई करण्यात येईल. सर्व संबंधित शेतकऱ्यांनी बँकेशी संपर्क साधण्याचे आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केले आहे.