मुंबई: दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सने धक्कादायकरित्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. डिव्हिलियर्सने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली.


डिव्हिलियर्सने अचानक घेतलेल्या या निवृत्तीमुळे क्रिकेट वर्तृळात एकच खळबळ उडाली आहे.

मिस्टर 360 म्हणून ओळखला जाणारा डिव्हिलियर्स मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यात चेंडू मारण्यात पटाईत होता. जगभरातील कोणत्याही गोलंदाजाला निधड्या छातीने सामोरं जाणारा फलंदाज म्हणून डिव्हिलियर्स ओळखला जात असे. त्यामुळे भले भले गोलंदाज त्याच्यासमोर अक्षरश: शरणागती पत्करत.

डिव्हिलियर्सचे रेकॉर्ड

कसोटी

एबी डिव्हिलियर्सने 17 डिसेंबर 2004 रोजी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातून कसोटीत पदार्पण केलं.

त्याने शेवटचा कसोटी सामना 30 मार्च 2018 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला आहे.

आंतरराष्ट्रीय 114 कसोटी सामन्यात डिव्हिलियर्सने  22 शतकं आणि 46 अर्धशतकांसह 8765 धावा केल्या आहेत.

वन डे

एबी डिव्हिलियर्सने 2 फेब्रुवारी 2005 रोजी इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल वन डेतून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.

त्याने शेवटचा वन डे सामना भारताविरुद्धच 16 फेब्रुवारी 2018 रोजी खेळला.

वन डेमध्ये त्याने 228 सामन्यात,  25 शतकं आणि 53 अर्धशतकांसह 9577 धावा केल्या आहेत.

टी ट्वेण्टी

 डिव्हिलियर्सने 24 फेब्रुवारी 2006 रोजी टी ट्वेण्टीमध्ये पदार्पण केलं.

त्याने शेवटचा टी ट्वेण्टी सामना 29 ऑक्टोबर 2017 रोजी खेळला आहे.

डिव्हिलियर्सने 78 टी ट्वेण्टी सामन्यात 10 अर्धशतकांसह 1672 धावा केल्या आहेत.

वेगवान शतक

दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज ए बी डिव्हिलर्सने 18 जानेवारी 2015 रोजी स्फोटक खेळी करत,नवा रेकॉर्ड केला. डिव्हिलियर्सने वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे सामन्यात अवघ्या 31 चेंडूत शतक ठोकलं. वन डे सामन्यात हा नवा रेकॉर्ड होता.

या सामन्यात डिव्हिलियर्सने 44 चेंडूंत नऊ चौकार आणि तब्बल 16 षटकारांसह 149 धावा कुटल्या होत्या.

त्यानंतर डिव्हिलियर्सने 27 फेब्रुवारी 2015 रोजी वेस्ट इंडिज विरुद्धच्याच सामन्यात 66 चेंडूत 162 धावांची वादळी खेळी केली होती.  या सामन्यात डिव्हिलियर्सनं 52 चेंडूंत शतक पूर्ण केलं होतं. विश्वचषकाच्या इतिहासातलं हे दुसरं सर्वात जलद शतक ठरलं होतं.