पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा पेपर फुटल्याची चर्चा आहे. अभियांत्रिकी शाखेच्या पहिल्या वर्षाचा हा पेपर सकाळी दहा ते बारा या वेळेत होता.
मात्र कोथरुडमधील एम आय टी शिक्षण संस्थेतून या पेपरची प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्याचं सांगण्यात येत आहे. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचं पथक याची माहिती घेण्यासाठी एमआयटी संस्थेमध्ये गेलं आहे.
एमआयटीने मात्र या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. नियमांनुसार परीक्षा सुरु झाली की अर्ध्या तासानंतर बाहेर जाऊ शकतो. अशा एखाद्या विद्यार्थ्याने तो व्हायरल केलेला असू शकतो असं संस्थेनं म्हटलं आहे.
विद्यापीठाचं स्पष्टीकरण
विद्यापीठाचे पथक याबाबतची माहिती घेण्यासाठी कोथरुडमधील एम आय टी संस्थेत गेले आहे. असा काही प्रकार खरंच घडला आहे का, हे या पथकाच्या तपासानंतरच सांगता येईल. एखादा विद्यार्थी पहिल्या अर्ध्या तासात परीक्षा हॉलमधून बाहेर येऊ शकतो. विद्यापीठाला याबाबत फोन आले, तेव्हा ही वेळ उलटून गेली होती, असं स्पष्टीकरण विद्यापीठाने दिलं आहे.