मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसला ठाण्यात मोठा धक्का बसला आहे. कारण आमदार निरंजन डावखरे हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित निरंजन डावखरे गुरुवारी (उद्या) भाजपत प्रवेश करणार आहेत.
निरंजन डावखरे यांनी पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राजीनामाही दिला आहे.
निरंजन डावखरे हे राष्ट्रवादीचे दिवंगत नेते वसंत डावखरे यांचे सुपुत्र आहेत.
निरंजन डावखरे हे राष्ट्रवादीकडून कोकण पदवीधर मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवडून गेले आहेत. मात्र आता ते राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
सध्या कोकण पदवीधर मतदारसंघांची निवडणूक घोषित झाली आहे. त्यामुळे राजकीय अंदाज घेत, निरंजन डावखरे भाजपशी संधान साधलं आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून निरंजन डावखरे हे भाजपशी जवळीक साधत असल्याची चर्चा होती. शिवाय स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा निरंजन डावखरेंच्या संपर्कात होते.
आता पालघर पोटनिवडणुकीच्या निमित्ताने निरंजन डावखरे भजापत प्रवेश करणार आहेत.
कोकण पदवीधर मतदारसंघ
निरंजन डावखरे कोकण पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते. त्यांची टर्म संपत असल्याने त्यांना लवकरच निवडणुकांना सामोरं जावं लागणार आहे.
कोकण पदवीधर मतदारसंघासाठी ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातून मतदान होणार आहे.
भाजप खासदर कपिल पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, तर शिवसेनेतून आमदार उदय सामंत यांच्या मदतीची गरज लागणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतून पुन्हा निवडून येणं कठीण असल्याने भाजप नेत्यांच्या संपर्कात होते. आता त्यांनी थेट भाजपत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
निरंजन डावखरे यांचा राजीनामा
कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड. निरंजन डावखरे यांनी आमदारपदाबरोबरच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही आज राजीनामा दिला, असं डावखरे यांच्या कार्यालयाने जाहीर केलं.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून आपण वडिलांच्या माध्यमातून पक्षाची जडणघडण पाहिली होती. त्यामुळे पक्ष सोडताना दुःख होत आहे, असे नमूद करीत आमदार डावखरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील स्थानिक पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून पक्षाबाहेर पडत असल्याचे स्पष्ट केले.
आपली पुढील वाटचाल लवकरच जाहीर करणार असल्याचे डावखरेंनी नमूद केले.
विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्याकडे आमदार डावखरे यांनी आमदारपदाचा राजीनामा आज सुपूर्द केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पक्षसदस्यत्वाचा राजीनामा पाठविला.
निरंजन डावखरे कोकण पदवीधर मतदारसंघातून 2012 मध्ये निवडून आले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पातळीवरील एका गटाकडून सातत्याने डावखरे कुटुंबाविरोधात कारवाया सुरु होत्या. या गटाने 2016 मध्ये झालेल्या विधानपरिषदेचे दिवंगत उपसभापती वसंत डावखरे यांच्या निवडणुकीतही पक्षविरोधी कारवाया केल्या. मात्र, त्यांच्याविरोधात काहीही कारवाई झाली नव्हती. आताही या गटाकडून आपल्याला सातत्याने स्थानिक स्थरावर डावलले जात होते. अखेर या स्थानिक पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून आपण राष्ट्रवादी काँग्रेसबाहेर पडण्याचा निर्णय घेतला, असे निरंजन डावखरे यांनी सांगितलं.