मुंबई : रशियात सुरु असलेल्या फिफा विश्वचषकाच्या निमित्ताने फुटबॉल विश्वाला रोमेलू लुकाकूच्या रुपात एक नवा चेहरा मिळाला आहे. बेल्जियमच्या या युवा फुटबॉलपटूने आपल्या कामगिरीने साऱ्या फुटबॉलविश्वाला आपली दखल घ्यायला भाग पाडलंय. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत लुकाकूने मिळवलेल्या या यशाचे अनेक पैलू आहेत.
रोमेलू लुकाकूने रशियातल्या फिफा विश्वचषकाच्या पहिल्या दोन सामन्यात तब्बल चार गोल झळकावून अवघ्या फुटबॉल जगताचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आहे. त्याच्या या कामगिरीने तो यंदाच्या विश्वचषकात गोल्डन बूटच्या शर्यतीतही दाखल झाला आहे.
25 वर्षांच्या लुकाकूची विश्वचषकात खेळण्याची ही दुसरी वेळ आहे. 2014 साली ब्राझिलमधल्या विश्वचषकातही त्याचा बेल्जियम संघात समावेश होता. पण लुकाकूला त्यावेळी फारशी संधी मिळाली नव्हती. तोच लुकाकू यंदाच्या विश्वचषकात बेल्जियम संघाचा आधारस्तंभ बनला आहे. त्याने पनामा आणि ट्युनिशियाविरुद्ध प्रत्येकी दोन गोल डागत बेल्जियमचं बाद फेरीचं तिकीटही कन्फर्म केलं.
प्रतिकूल परिस्थितीवर मात
रोमेलू लुकाकूची कारकीर्द आज बहरात असली तरी त्याच्या कारकीर्दीला त्याची मेहनत आणि कष्टाची तितकीच जोड आहे. लुकाकूचा जन्म बेल्जियमच्या अँटवर्पमधला. त्याचे वडीलही व्यावसाईक फुटबॉलपटू. पण वडील कारकीर्दीच्या अंतिम टप्प्यात असताना त्यांच्या कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटली आणि लुकाकूच्या परिवारावर गरिबीचे चटके सोसण्याची वेळ आली.
एका मुलाखतीदरम्यान लुकाकूने सांगितलेली एक आठवण त्यावेळच्या परिस्थितीची जाणीव करुन देते. लुकाकू म्हणतो, “मला आजही तो दिवस आठवतोय जेव्हा मी सहा वर्षाचा होतो. एके दिवशी मी शाळेतून घरी आलो. तेव्हा पाहिलं की जेवणापूर्वी माझी आई दुधात पाणी टाकत होती, जेणेकरुन कुटुंबातील सर्वांची दुधाची गरज भागेल. त्यादिवशी मला पहिल्यांदा गरिबीची जाणीव झाली. त्यावेळी आमच्याकडे एवढेपण पैसे नव्हते, की आम्ही आमच्या आठवड्याभराच्या गरजाही पूर्ण करु शकू.”
पण अशा प्रतिकूल परिस्थितीतही लुकाकू लहानपणापासूनच एक स्वप्न उराशी बाळगून होता. त्याचं ते स्वप्न होतं, सर्वोत्तम फुटबॉलर बनण्याचं. वयाच्या सहाव्या वर्षीच त्याने फुटबॉलचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. बारा वर्षाचा असताना त्याने 34 सामन्यांत 76 गोल झळकावण्याचा पराक्रम गाजवला होता आणि महत्त्वाचं म्हणजे लुकाकूने त्यावेळी खेळताना घातलेले शूज हे त्याच्या वडिलांचे होते. लुकाकूने त्यानंतर परिस्थितीवर मात करत आपला खेळ आणखी उंचावला आणि त्याचं फळ त्याला मिळालं ते 2009 साली. बेल्जियमच्या नावाजलेल्या अँडरलेच फुटबॉल क्लबने लुकाकूला त्याच्या सोळाव्या वाढदिवसादिवशीच करारबद्ध केलं. त्यानंतर मात्र लुकाकूने मागे वळून पाहिलंच नाही.
व्यावसाईक फुटबॉलमध्ये 134 गोल नावावर
रोमेलू लुकाकूने आजवरच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत 71 सामन्यात 40 गोल नोंदवले आहेत. तर व्यावसाईक फुटबॉलमध्ये 134 गोल त्याच्या नावावर जमा आहेत. सहा फूट तीन इंच उंचीचा हा बेल्जियन वीर सध्या व्यावसाईक फुटबॉलमध्ये इंग्लंडमधल्या आघाडीच्या मँचेस्टर युनायटेड क्लबचा महत्त्वाचा शिलेदार मानला जातो.
रोमेलू लुकाकूने खडतर परिस्थितीवर मात करत मिळवलेलं हे यश खरोखरच कौतुकास्पद आहे. परिस्थिती यशाच्या आड कधीच येत नाही हे लुकाकूच्या या संघर्षातून दिसून येतं. त्यामुळे रोमेलू लुकाकू हा परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या अनेक खेळाडूंसाठी खऱ्या अर्थाने एक आदर्श आहे.
रोमेलू लुकाकू... आंतरराष्ट्रीय फुटबॉल विश्वाचा नवा चेहरा!
सिद्धेश कानसे, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
25 Jun 2018 10:13 PM (IST)
बेल्जियमच्या या युवा फुटबॉलपटूने आपल्या कामगिरीने साऱ्या फुटबॉलविश्वाला आपली दखल घ्यायला भाग पाडलंय. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत लुकाकूने मिळवलेल्या या यशाचे अनेक पैलू आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -