मुंबई : माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या टीम इंडियाने पाकिस्तानला हरवून ट्वेन्टी ट्वेंटी क्रिकेटच्या दुनियेत नवा इतिहास घडवला तो दिवस होता दिनांक 24 सप्टेंबर 2007. भारतीय संघाच्या त्या विश्वचषक विजयाला आज दहा वर्षे झाली.


दहा वर्षांनी टीम इंडिया विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली पुन्हा क्रिकेटच्या मैदानात उतरली होती. या वेळी सामना वन डेचा होता. प्रतिस्पर्धी संघ होता ऑस्ट्रेलिया आणि मैदान होतं इंदूरचं होळकर स्टेडियम. धोनीच्या टीम इंडियाने ट्वेन्टी ट्वेंटीच्या विश्वचषकावर आपलं नाव कोरलं ते मैदान होतं जोहान्सबर्गचं वॉण्डरर्स स्टेडियम. टीम इंडियाच्या जोहान्सबर्ग ते इंदूर या प्रवासात ट्वेंटी ट्वेंटी विश्वचषक विजेत्या फौजेतले केवळ दोनच शिलेदार आजच्या विराटसेनेत उरलेत. एकाचं नाव महेंद्रसिंग धोनी, तर दुसऱ्याचं नाव रोहित शर्मा.

दिग्गज कर्णधार महेंद्र सिंह धोनी

2007 सालचा जहाल धोनी आज फलंदाज म्हणून तुलनेत बराच मवाळ झाला आहे. पण 2007 सालच्या विश्वचषकाने त्याच्यातल्या कर्णधाराला दिलेली ओळख त्याने गेल्या दहा वर्षांत नक्कीच खरी ठरवली. धोनीच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने 2011 सालचा वन डेचा विश्वचषक जिंकला.

भारतीय संघाने 2013 साली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं तेव्हाही कर्णधार धोनीच होता. त्याच कालावधीत धोनीच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडिया कसोटी क्रमवारीतही नंबर वन झाली होती.

फलंदाजीतला सूर आजही कायम असलेला रोहित शर्मा

रोहित शर्माला एक गुणवान फलंदाज म्हणून पहिली ओळख ट्वेन्टी ट्वेन्टीच्या पहिल्या विश्वचषकानेच दिली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात नाबाद 50 धावांची त्याची मॅचविनिंग खेळी भारतीय क्रिकेटरसिकांना कधीच विसरता येणार नाही. भारताच्या वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी संघाचा तो आजही अविभाज्य घटक आहे. पण कसोटी क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध करण्याचं आव्हान रोहितसमोर अजूनही कायम आहे.

निर्णायक कामगिरी बजावणारा गौतम गंभीर

2007 सालच्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात टीम इंडियाच्या फायनलमधल्या विजयात गौतम गंभीरची कामगिरी निर्णायक होती. त्याने सलामीला 75 धावांची खेळी करून भारताला पाच बाद 157 धावांची मजल मारून दिली होती. 2011 सालच्या वन डे विश्वचषकाच्या फायनलमध्ये हाच गौतम गंभीर भारताच्या मदतीला धावून आला होता. पण पुढच्या काळात गंभीरच्या फलंदाजीचा तो सूर हरवला. टीम इंडियाच्या नव्या नेतृत्त्वाशीही त्याचे सूर जुळले नाहीत. परिणामी आजच्या भारतीय संघात गंभीरला स्थान नाही.

स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग

वीरेंद्र सेहवागने 2007 सालच्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात त्याच्या लौकिकाला साजेशी कामगिरी बजावली नव्हती. पण पाकिस्तानविरुद्धच्या साखळी सामन्यात त्याने बोलआऊटमध्ये बजावलेली कामगिरी भारताच्या विजयात निर्णायक ठरली होती. भारताचा हा धडाकेबाज फलंदाज आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे.

अजित आगरकर

धोनीच्या त्या टीम इंडियाचा आणखी एक शिलेदार म्हणजे अजित आगरकरही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. पण सेहवाग आणि आगरकरने समालोचकाच्या भूमिकेत अजूनही क्रिकेटशी नातं जपलं आहे.

सिक्सर किंग युवराज सिंह

2007  सालचा ट्वेन्टी ट्वेन्टीचा विश्वचषक ही युवराज सिंहची मोठी ओळख आहे. त्याने इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडला सहा चेंडूंत ठोकलेले सहा षटकार क्रिकेटविश्वाला विसरता येणार नाही. त्याच खेळीत त्याने 12 चेंडूंत झळकावलेलं अर्धशतक आजही ट्वेन्टी ट्वेन्टीतलं वेगवान अर्धशतक आहे. पण आजच्या वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टीसाठीच्या भारतीय संघात युवराजला ध्रुवपद नाही. किंबहुना त्याचा जमाना परत येण्याची चिन्हंही दिसत नाहीत.

संघातून बाहेर गेलेली मोठी नावं

हरभजनसिंग, इरफान पठाण, युसूफ पठाण, पियुष चावला आणि आरपी सिंग ही नावं आजही भारतीय क्रिकेटमध्ये मोठी आहेत. पण त्यांचाही टीम इंडियातला जमाना संपल्याचीच चिन्हं आहेत. रॉबिन उथप्पा आणि दिनेश कार्तिक अधूनमधून टीम इंडियाच्या आसपास घुटमळताना दिसतात. मात्र दोघांनाही अद्याप संघात पक्क स्थान निर्माण करता आलेलं नाही.

ऐतिहासिक सामन्यात निर्णायक भूमिका बजावणारी जोडी

ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारताला मिसबाह उल हकची निर्णायक विकेट मिळवून देणारी जोडी म्हणजे जोगिंदर शर्मा आणि श्रीशांत. त्या दोघांची तोंडं आज एकमेकांच्या विरुद्ध दिशेला आहेत.

2013 सालच्या आयपीएलमध्ये मॅचफिक्सिंग प्रकरणात अडकलेल्या श्रीशांतला आधी दिल्लीच्या पटियाला कोर्टाने आणि त्यानंतर केरळ उच्च न्यायालयाने दिलासा दिला असला, तरी बीसीसीआयने केरळ उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पुन्हा अपील केलं आहे. त्यामुळं श्रीशांत अजूनही संशयाच्या भोवऱ्यात आहे.

मिसबाह उल हकचा काटा काढणारा मध्यमगती गोलंदाज जोगिंदर शर्मा मात्र आज डीएसपी म्हणून हिस्सारमध्ये हरियाणा पोलिसांच्या सेवेत आहे.