मुंबई : राज्याच्या विविध भागात सात मुलींसह एकूण 10 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. जालना जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनेत 5 मुलींचा बुडून मृत्यू झाला. तर सांगलीतही दोन सख्या बहिणींचा बुडून मृत्यू झाला. अमरावतीतही नाल्यात पडून तीन मुलांचा मृत्यू झाला आहे.

बदनापूरच्या कस्तुरवाडीमधून वाहणाऱ्या नदीत बुडून तीन मुलींचा मृत्यू झाला आहे. 20 वर्षीय गजाला शेख आणि 18 वर्षीय सूरय्या शेख अशी मृत्यू झालेल्या सख्ख्या बहिणींची नावं आहेत. तर या दोघींसोबत त्यांची मैत्रीण सायमा पठाण देखील नदीत वाहून गेली. या तिघी कपडे धुण्यासाठी नदीवर गेल्या असता हा अपघात घडला.

गेल्या 4 दिवसांपासून जोरदार पावसामुळं नदीच्या पातळीत चांगलीच वाढ झाल्यानं मुलींना पाण्याचा खोलीचा अंदाज आला नाही. त्यामुळं त्यांचा बुडून मृत्यू झाला.

मंठा तालुक्यातील वाई गावात विहिरीत पडून दोन सख्या बहिणींचा मृत्यू झाला आहे. माकड मागे लागल्यानं साक्षी आणि मीनाक्षी गायकवाड या दोघी बहिणी विहीरीत पडल्या.

दुसरीकडे सांगली जिल्ह्यातील करोली गावात दोन सख्ख्या बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. जिजाबाई वाघ आणि केशवणी वाघ अशी मुलींची नावं आहेत.

दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील चिखलदरामध्ये देखील नाल्यात पडून 3 अल्पवयीन आदिवासी मुलांचा मृत्यू झाला. राजेश राजाराम दहिकर (17), प्रेम प्यारेलाल भास्कर (8) व अशोक प्यारेलाल भास्कर (11) अशी मृत मुलांची नाव आहेत. विशेष म्हणजे यात दोन सख्या भावांचा समावेश आहे.