PHOTO : आजपासून आखाड्यात 'महाराष्ट्र केसरी'चा थरार; जाणून घ्या मानाच्या गदेचा रंजक इतिहास
तब्बल दोन वर्षानंतर आखाड्यात कुस्तीचा खेळ रंगणार आहे. आजपासून साताऱ्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोना प्रादुर्भावामुळे दोन वर्ष ही स्पर्धा भरवण्यात आली नव्हती. आता मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे ही स्पर्धा भरवण्याचा निर्णय महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेनं घेतला आहे.
त्यामुळे पैलवानांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसत आहे. तसेच मानाची चांदीची गदा पटकावण्यासाठी आखाड्यात चुरस रंगणार आहे. पण ही मानाच्या गदेची परंपरा आली कुठून? ही गदा कोण तयार करतं? यांसारखे अनेक प्रश्न आपल्या प्रत्येकाच्याच मनात येतात. जाणून घेऊया महाराष्ट्र केसरीच्या मानाच्या गदेचा इतिहास आणि परंपरा...
यंदा महाराष्ट्र केसरीचा आखाडा साताऱ्यात रंगणार आहे. आजपासून या स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावणाऱ्या मल्लांसाठी चांदीची गदा दिली जाते.
यंदाची गदा माजी खासदार अशोक मोहोळ यांच्या पुण्यातील घरातून आज साताऱ्याला रवाना होत आहे. 1983 पासून अशोक मोहोळ स्वतःच्या खर्चानं ही चांदीची गदा तयार करून महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी देतात.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेला 1961 साली सुरुवात झाली. सुरुवातीला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेकडून ही गदा विजेत्या मल्लाला दिली जात होती. कुस्ती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मामासाहेब मोहोळ यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र अशोक मोहोळ यांनी त्यांच्या वडीलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही चांदीची गदा दरवर्षी देण्याची इच्छा व्यक्त केली. कुस्तीगीर परिषदेकडून त्याला मान्यता देण्यात आली. तेव्हापासून ही परंपरा सुरू आहे.
महाराष्ट्र केसरीच्या मानाच्या गदेची लांबी साधारणपणे 27 ते 30 इंच असते, तर व्यास 9 ते 10 इंच असतो. महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं जेतेपद पटकावणारा पैलवान ही गदा उंचावतो. या गदेचं वजन तब्बल 10 ते 12 किलो असतं.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेची मानाची गदा सागाच्या लाकडापासून तयार केली जाते. त्यावर कोरीव काम करुन गदेवर चांदीच्या पत्र्याचं कोटींग केलं जातं. या गदेच्या मध्यभागी एका बाजुला हनुमानाचं चित्र तर दुसऱ्या बाजुला मामासाहेब मोहोळ यांची प्रतिकृती बसवलेली असते. ही गदा मिळवणं हे महाराष्ट्रातील प्रत्येक मल्लाचं स्वप्न असतं.