कोल्हापूरचा पैलवान पृथ्वीराज पाटील यंदाचा महाराष्ट्र केसरी
महाराष्ट्राच्या मातीतील प्रतिष्ठेची स्पर्धा महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesri) नुकतीच पार पडली असून अत्यंत अटीतटीच्या सामन्यात कोल्हापूरचा पैलवान पृथ्वीराज पाटील याने 5-4 च्या फरकाने मुंबई पश्चिमचं नेतृत्त्व करणाऱ्या विशाल बनकरला मात दिली आहे. विशेष म्हणजे जवळपास 21 वर्षानंतर कोल्हापूरला महाराष्ट्र केसरीची मानाची गदा मिळाली आहे. याआधी विनोद चौगुले यांनी महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोना महामारीच्या (Corona Virus) संकटामुळे गेले दोन वर्ष जणू काही सारं विश्वच थांबलं होतं. त्यात ही स्पर्धाही पार पडली नव्हती. मात्र आता निर्बंधमुक्तीनंतर जनजीवन रुळावर येत असून ही स्पर्धाही साताऱ्यात उत्साहात पार पडली.
यंदाच्या 'महाराष्ट्र केसरी' (Maharashtra Kesari Kusti Championship) स्पर्धेला सुरुवात झाली आणि बघता बघता किताबाच्या कुस्तीची वेळही जवळ आली आहे. आज म्हणजेच 9 एप्रिलला महाराष्ट्र केसरी किताबाची कुस्ती मॅटवर रंगली.
या कुस्तीत खुल्या म्हणजे 86 ते 125 किलो वजनी गटाच्या माती आणि गादी विभागाच्या अंतिम फेरीत विजयी झालेले दोन पैलवान आमनेसामने होते. विशेष म्हणजे दोघेही कोल्हापूरच्या तालमीत तयार झाले आहेत. पण यातील एक पृथ्वीराज पाटील कोल्हापूरचं तर दुसरा विशाल बनकर मुंबईचं प्रतिनिधित्व करत होता. अटीतटीच्या लढतीत अखेर पृथ्वीराजने विशालला 5-4 ने मात दिली.
आंतरराष्ट्रीय दर्जावर कुस्ती खेळलेला पृथ्वीराज हा कोल्हापूरच्या मातीत तयार झालेला पैलवान आहे. पृथ्वीराज पाटील हा मूळचा पन्हाळा तालुक्यातल्या देवठाणेचा पैलवान आहे. कोल्हापुरात जालिंदर आबा मुंडे यांच्या शाहू कुस्ती केंद्रात तो लहानाचा मोठा झाला.
सध्या पुण्याच्या आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूटमध्ये ट्रेनिंग सुरु असून अमर निंबाळकर आणि राम पवार त्याचे प्रशिक्षक आहेत. दरम्यान आज पृथ्वीराज जिंकल्याने 21 वर्षानंतर कोल्हापूरला महाराष्ट्र केसरीचा मान मिळाला आहे.