IPL 2023: कोलकाताचे आव्हान संपले, राजस्थानचे प्लेऑफमधील आव्हान जिवंत
KKR vs RR, Match Highlights: युजवेंद्र चहलच्या भेदक माऱ्यानंतर यशस्वी जायस्वाल याच्या वादळी फंलदाजीच्या जोरावर राजस्थानने सहज विजय मिळवला. कोलकात्याने दिलेले 150 धावांचे आव्हान राजस्थानने नऊ विकेट आणि 41 चेंडू राखून सहज पार केले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया विजयासह राजस्थानने स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवलेय. राजस्थानचा हा सहावा विजय होय.. या विजयासह राजस्थानने आघाडीच्या चार संघामध्ये स्थान पटकावलेय. राजस्थानचे 12 गुण झाले आहेत. राजस्थानला प्लेऑफमद्ये पोहचण्यासाठी उर्वरित दोन्ही सामन्यात विजय अनिवार्य आहे.
कोलकात्याने दिलेले 150 धावांचे आव्हान पार करताना राजस्थानने आक्रमक सुरुवात केली. पहिल्याच षटकात यशस्वी जायस्वाल याने 26 धावांचा पाऊस पाडला. पण दुसऱ्याच षटकात जोस बटलर तंबूत परतला. जोस बटलर याला एकही धाव काढता आली नाही. तो धावबाद झाला..
जोस बटलर बाद झाल्यानंतर कर्णधार संजू सॅमसन याच्या मदतीने यशस्वीने राजस्थानला विजय मिळवून दिला. अवघ्या 69 चेंडूत या दोघांनी 121 धावांची भागिदारी केली. यामध्ये यशस्वी जयस्वाल याचे योगदान 71 होते तर संजूचे योगदान 48 इतके होते.
21 वर्षीय यशस्वी जयस्वाल याने पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक पवित्रा घेतला होता. यशस्वी जयस्वाल याने अवघ्या 13 चेंडूत अर्धशतक झळकावले. हे आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक होय. यशस्वी जायस्वाल याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. यशस्वी जयस्वास याने 47 चेंडूत नाबाद 98 धावांची खेळी केली. या खेळीत यशस्वी जयस्वाल याने पाच षटकार आणि 12 चौकार लगावले.
कर्णधार संजू सॅमसन यानेही वादळी फलंदाजी करत यशस्वीला चांगली साथ दिली. संजू सॅमसन याने अवघ्या 29 चेंडूत 48 धावांचे योगदान दिले. यामध्ये त्याने पाच षटकार आणि दोन चौकार लगावले. संजू सॅमसन याने कर्णधाराला साजेशी खेळी केली. यशस्वी जयस्वाल आणि संजू सॅमसन या जोडीपुढे कोलकात्याची गोलंदाजी दुबळी जाणवत होती.
कोलकात्याच्या एकाही गोलंदाजाला विकेट घेता आली नाही. अनुकूल रॉय, सुयेश शर्मा, सुनील नारायण, वरुण चक्रवर्ती, शार्दूल ठाकूर, हर्षित राणा आणि नीतीश राणा यांना विकेट घेण्यात अपयश आले.
युजवेंद्र चहल याच्या भेदक गोलंदाजीपुढे कोलकात्याने निर्धारित 20 षटकात आठ विकेटच्या मोबदल्यात 149 धावांपर्यंत मजल मारली. चहल याने विकेटचा चौकार लगावला.