MPL 2023 स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन
MPL 2023, Ruturaj Gaikwad Kedar Jadhav : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने (एमसीए) आयोजित केलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) स्पर्धेचे भक्ती-शक्तीच्या वारीने दिमाखात उद्घाटन झाले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्पर्धेताला सुरुवात होण्यापूर्वी गणेशवंदना झाली. त्यानंतर अभिनेत्री अमृता खानविलकरच्या चंद्रा गाण्यावरील नृत्य अदाही झाल्या.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) ची सुरुवात गहूंजे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय मैदानात झाली. या स्पर्धेचे उदघाटन गणेशवंदनाने झाले. त्यानंतर मराठी आणि हिंदी गाण्यांवर नृत्य सादर करण्यात आले. शंकर महादेवन यांनी गायलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीगचे टायटल सॉंगवर अमृता खानविलकर हिने नृत्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
उद्घाटनप्रसंगी एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार, उपाध्यक्ष किरण सामंत, सचिव शुभेंद्र भांडारकर, सहसचिव संतोष बोबडे, खजिनदार संजय बजाज आणि एमपीएलचे अध्यक्ष सचिन मुळ्ये आदी मान्यवर उपस्थित होते. याशिवाय एमसीएमधील इतर पदाधिकारी सुहास पटवर्धन, सुनील मुथा, विनायक द्रविड केशव वझे राजू काणे, ॲडव्होकेट अजय देशमुख, राजवर्धन कदमबांडे, अतूल जैन, ॲडव्होकेट कमलेश पिसाळ, सुशील शेवाळे, रणजीत खिरिड, कल्पना तापिकर उपस्थित होत्या.
याप्रसंगी स्पर्धा सूरू होण्याआधी 1973च्या महिला संघातील खेळाडू शमा लुंकड, माधुरी सावंत, विजया पाटील, कल्पना तापीकर, उज्वला पवार, निलिमा जोगळेकर आणि सध्याच्या भारतीय संघाची खेळाडू स्मृती मानधना यांचा सत्कार करण्यात आला.
स्पर्धेचा उद्घाटनाचा सामना ऋतुराज गायकवाडचा पुणेरी बाप्पा व केदार जाधवचा कोल्हापूर टस्कर्स यांच्यात सुरू झाला आहे. ऋतुराज गायकवाड याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोल्हापूर टस्कर्सने दमदार सुरुवात करत पुण्यापुढे मोठे आव्हान उभे केलेय. ईगल नाशिक टायटन्स, छत्रपती संभाजी किंग्ज, रत्नागिरी जेट्स आणि सोलापूर रॉयल्स हे सहा संघ साखळी (लीग फॉरमॅट) पद्धतीने एकमेकांशी झुंजणार असून गुरुवार दिनांक 29 जून रोजी स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे.