Sam Konstas vs Jasprit bumrah : अवघ्या 19 वर्षांच्या सॅम कॉन्स्टासने बुमराहच्या भीतीचं सावट झटक्यात नाहीसं केलं, एका षटकात ठोकल्या सर्वाधिक धावा
मेलबर्नमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटीला सुरुवात झाली आहे. या सामन्यात पॅट कमिन्सने 19 वर्षीय युवा सलामीवीर सॅम कॉन्स्टासला मैदानात उतरवले. पदार्पणाच्या सामन्यातच त्याने बॅटने कहर केला. या मालिकेतील सर्वात यशस्वी गोलंदाज जसप्रीत बुमराहचा सॅम कॉन्स्टासने चांगलाच समाचार घेतला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसॅम कॉन्स्टासने बुमराहच्या एकाच षटकात 18 धावा काढल्या, जे बुमराहच्या कसोटी कारकिर्दीतील आतापर्यंतचे सर्वात महागडे षटक आहे. एवढेच नाही तर त्याने बुमराहविरुद्ध दोन षटकारही ठोकले. कसोटी क्रिकेटमध्ये बुमराहला षटकार मारणारा तो फक्त सातवा आणि दोन षटकार मारणारा दुसरा खेळाडू आहे.
जसप्रीत बुमराहविरुद्ध सॅम कॉन्स्टासने सुरुवातीपासूनच आक्रमक दिसत होता. सुरुवातीच्या काही षटकांमध्येच रॅम्प शॉट्स खेळण्याचा प्रयत्न केला. पहिल्या 3 षटकांमध्ये तो अपयशी ठरला, पण कॉन्स्टास थांबला नाही.
डावाच्या सातव्या षटकात त्याने बुमराह विरुद्ध थर्ड मॅनवर रिव्हर्स शॉटद्वारे पुन्हा षटकार ठोकला. कसोटी क्रिकेटमध्ये 3 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर आणि 4483 चेंडूनंतर बुमराहविरुद्ध मारलेला हा पहिला षटकार होता. या षटकात कॉन्स्टासनेही 2 चौकार मारत 14 धावा केल्या.
मात्र, 11व्या षटकात बुमराह आला तेव्हा सॅम कॉन्स्टासने पुन्हा एकदा त्याचा समाचार घेतला. यावेळी त्याने 2 चौकार, 1 षटकार आणि दोन दुहेरीसह 18 धावा काढल्या. जसप्रीत बुमराहच्या कसोटी कारकिर्दीतील हे सर्वात महागडे षटक ठरले. आजपर्यंत त्याने कधीच इतक्या धावा दिल्या नव्हत्या.
सॅम कॉन्स्टासने या सामन्यात पदार्पण केले आहे. ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण करणारा तो चौथा सर्वात तरुण खेळाडू आहे. पहिल्याच सामन्यात त्याने शानदार खेळी खेळली आणि केवळ 52 चेंडूत 50 धावा केल्या. सॅम कॉन्स्टासने 65 चेंडूत 60 धावांची खेळी खेळली. यानंतर रवींद्र जडेजाने त्याची शिकार केली.