Pandharpur : नवरात्रीची तिसरी माळ, रुक्मिणी माता तुळजाभवानीच्या रुपात, विठूराया सजला ठेवणीतील दागिण्यात

शारदीय नवरात्र महोत्सवाला विठ्ठल मंदिरात मोठ्या उत्साहाने सुरुवात झाली असून आज तिसऱ्या माळेला रुक्मिणी मातेस तुळजाभवानीच्या रुपात सजविण्यात आले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नवरात्रीचे नऊ दिवस रुक्मिणी मातेला रोज वेगळ्या अवताराचा पोशाख करण्यात येत असतो. या पोषाखावर पारंपारीक ठेवणीतील मौल्यवान हिरेजडीत दागिने घालण्यात येतात.

आज तिसऱ्या माळेला रुक्मिणीमातेला तुळजाभवानीच्या रूपात सजविण्यात आले आहे. कमरेवर हात ठेऊन उभी असणाऱ्या जगन्मातेला वैशिष्ठ्यपूर्ण सजावट करीत मंचकी बसलेल्या रूपात सजविले आहे.
हिरव्या रंगाच्या भरजरी शालूंमध्ये दागिन्यात नटलेले रुक्मिणीमातेचे हे तुळजाभवानी रूप अधिकच खुलून दिसत आहे.
आज रुक्मिणी मातेला सोन्याचा मुकुट, मणी मोत्याच्या पाटल्या, तन्मणी, मांडरे कंठ, लहान सरी, तानवड जोड, सूर्य, पेट्याची बिंदी, तारा मंडळ, मत्स्य जोड, रूळ जोड, सोन्याचे पैंजण, चिंचपेटी, कंबर पत्ता, वाक्य जोड, हिऱ्याची नथ कर्णफुले याने मढविण्यात आलं.
तसेच मोहरांची माळ, बाजीराव गरसोळी, दशावतारी हार, पानड्याचा हार, मोत्याचे मंगळसूत्र असे अतिशय ठेवणीतील 23 पुरातन दागिन्याने रुक्मिणीमातेला मढविण्यात आले आहे.
विठुरायाला सोन्याचा मुकुट, कौस्तुभ मणी, दंडपेट्या, हिऱ्याचे कंगन जोड, शिरपेच, मोत्याचा तुरा, चंद्रहार, अष्टपैलू मण्यांची कंठी, मोहन माळ तोडे आणि सोन्याचा गोफ असे 12 ठेवणीतील दागिन्यात नटविण्यात आले होते.