Sindhutai Sapkal : जाणून घेऊया सिंधुताई सपकाळांचा जीवनप्रवास!
Sindhutai Sapkal : 'अनाथांची माय' अशी ओळख असणाऱ्या सिंधुताई सपकाळांचा जीवनप्रवास वयाच्या 75 व्या वर्षी संपला. त्यांच्या या सोनेरी प्रवासाचा घेतलेला आढावा...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआई-वडिलांना मुलगी नको होती, 'नकुशी' होती म्हणून नाव चिंधी ठेवलं...जन्मापासून सुरु झालेला चिंधीचा हा संघर्ष लग्न झाल्यानंतरही कायम राहिला, नवऱ्यानेच चारित्र्यावर संशय घेतल्यानंतर गावाने वाळीत टाकलं. आयुष्यात भीक मागून खायची वेळ आली...मग जगण्यासाठी शेवटी स्मशान गाठलं. पण समोर आलेल्या संकटांच्या छाताडावर बसून त्यावर मात केली आणि हजारो अनाथांच्या जीवनाचं सोनं केलं. 'अनाथांची माय' असलेल्या सिंधुताई सपकाळ उर्फ माई यांचा हा जीवनप्रवास. सिंधुताईंची प्राणज्योत आज मावळली.
सिंधुताई सपकाळ यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1947 रोजी वर्धा येथे झाला. नको असताना मुलगी झाली म्हणून आई-वडिलांनी तिचे नाव चिंधी ठेवले. वर्धा जिल्ह्यातील जंगल भागातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी. त्यांचे वडील गुरे वळायचे काम करायचे. गाव लहान असल्याने तेथे सुविधांचा अभाव. घरची गुरे राखायला म्हणून रोज सकाळी बाहेर पाठवायचे आणि माई शाळेत जाऊन बसायच्या. मूळच्या बुद्धिमान असल्या तरी माईंना जेमतेम चौथीपर्यंत शिकता आलं.
माईंचा विवाह वयाच्या नवव्या वर्षी त्यांच्यापेक्षा वयाने 26 वर्षांनी मोठा असलेल्या श्रीहरी सपकाळ याच्याशी झाला. आई-वडिलांच्या घरी सुख मिळालं नाही, किमान सासरी तरी सुख मिळेल अशी आशा त्यांना होती. पण माईंच्या नशिबात काही वेगळंच होतं. त्यांना घरी प्रचंड सासुरवास सोसावा लागला.
अठराव्या वर्षापर्यंत माईंची तीन बाळंतपणे झाली. तेव्हा गुरे वळणे हाच व्यवसाय असायचा. शेकड्यांनी गुरे असलेल्या त्या गावातील शेणाचा लिलाव करण्यासाठी वनखात्यातील अधिकारी यायचे. याच ठिकाणी माईंचा पहिला सामाजिक संघर्ष सुरु झाला. या लिलावाविरोधात माईंनी बंड पुकारला आणि या लिलावात ज्यांना हप्ता मिळायचा त्यांच्या हप्त्यावर गदा आली. हा लढा त्या जिंकल्या पण त्यांना या लढ्याची जबर किंमत चुकवावी लागली.
त्या गावातील सावकाराचे यामुळे आर्थिक हितसंबंध दुखावले गेले. त्याला जंगलखात्याकडून येणारी मिळकत बंद झाली. त्यामुळे माईंच्या चौथ्या बाळंतपणावेळी त्याने माईंच्या पोटातील मूल आपले असल्याचा प्रचार सुरू केला. नवऱ्याच्या मनात माईंच्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण झाला आणि पूर्ण दिवस भरलेल्या ताईंना त्याने बेदम मारून घराबाहेर काढले.
सासरमधून मारून बाहेर काढल्यानंतर माईंना त्यांच्या माहेरीही आसरा मिळाला नाही. मग माईंवर भीक मागायची वेळ आली. जळगाव जिल्ह्यातील पिंपराळा स्टेशनवर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला पण नंतर त्या मागे फिरल्या. सिंधुताई दिवसभर भीक मागायच्या आणि रात्री स्टेशनवरच झोपायच्या.
सासरमधून मारून बाहेर काढल्यानंतर माईंना त्यांच्या माहेरीही आसरा मिळाला नाही. मग माईंवर भीक मागायची वेळ आली. जळगाव जिल्ह्यातील पिंपराळा स्टेशनवर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला पण नंतर त्या मागे फिरल्या. सिंधुताई दिवसभर भीक मागायच्या आणि रात्री स्टेशनवरच झोपायच्या.
अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी माईंनी 1994 साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली. या ठिकाणी अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला, त्यांना जेवण, कपडे पुरवले. या अनाथ मुलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी केलं. आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून त्यांची लग्न लावून दिली.
माईंनी आपल्या कार्यासाठी आंतरराष्ट्रीय निधी मिळावी या हेतूने 'मदर ग्लोबल फाउंडेशन'ची स्थापना केली. माईंच्या जीवनावर आधारलेला 'मी सिंधुताई सपकाळ' हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर भार्गव फिल्म्स ॲन्ड प्रॉडक्शनचा ’अनाथांची यशोदा’ या नावाचा अनुबोधपट 2014 साली प्रदर्शित झाला आहे.
माईंचे जीवनाची सुरुवात 'नकुशी'ने झाली... नंतर त्यांनी एका अग्नीदिव्याप्रमाणे संघर्ष केला. केवळ स्वत:चंच नव्हे तर हजारो अनाथांच्या 'अवघ्या जीवनाचं सोनं' केलं. अशा या 'अनाथांच्या माय' असलेल्या सिंधुताई सपकाळांचा जीवनप्रवास आज संपला असला तरी त्यांच्या कार्याचा ठसा मात्र कायम राहणार आहे.