Raigad : खाडीतील नारळ मिळविण्यासाठी 50 फूट उंचीवरून खाडीत उड्या, तरुणांचा थरार, गावकऱ्यांची गर्दी
'नारळी पौर्णिमे'चा उत्सव राज्यभरात साजरा केला जात असताना रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील हा उत्सव काहीसा थरारक पद्धतीने साजरा केला जातो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअलिबाग तालुक्यातील धरमतर पुलावर हजारो गावकरी एकत्र येतात आणि सागराला नारळ अर्पण करत असतात. याचवेळी गावातील काही तरुण हे सागराला अर्पण केलेला नारळ मिळविण्यासाठी तब्बल 40 ते 50 फूट उंचीवरील पुलावरून खाडीत उड्या मारून हा नारळ मिळविण्याचा थरारक प्रयत्न करताना दिसून येतात.
नारळी पौर्णिमेचा उत्सव हा आगरी - कोळी समाजाचा आनंदाचा उत्सव मानला जातो. रायगड जिल्ह्यातील पूर्व भागात आगरी कोळी समाज हा मोठ्या प्रमाणात दिसून येतो. खाडी आणि समुद्रालगत राहणार हा समाज शेती, मिठागर आणि मासेमारी करीत उपजीविका करत असतो.
पावसाळ्याच्या हंगामात समुद्राला खवळलेला असून नारळी पौर्णिमेनंतर समुद्र काहीसा शांत होतो, असे मानले जाते. यावेळी नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने समुद्राला नारळ अर्पण करून कुटुंबियांच्या सुरक्षेची प्रार्थना करण्यात येते.
या निमित्ताने अलिबाग तालुक्यातील धरमतर पुलाजवळील शहाबाज, पेझारी, पोयनाड, वडखळ आणि पंचक्रोषीतील हजारो गावकरी हे समुद्राला नारळ अर्पण करण्यासाठी जमा झाले होते.
यावेळी सायंकाळच्या सुमारास हे गावकरी धरमतर पुलावर जमा होऊन नारळ अर्पण करण्यात आला. गावातील तरुण हे समुद्राला अर्पण केलेला नारळ मिळविण्यासाठी तब्बल 40 ते 50 फूट उंचीवरील पुलावरून पाण्यात उडी मारून नारळ मिळविण्याचा प्रयत्न करताना दिसून आले.
तरुणांचा हा थरार पाहण्यासाठी अनेक गावकरी हे पुलाच्या दुतर्फा गर्दी केली होती. तर पुलाच्या दुसऱ्या बाजूला देखील अशीच चढाओढ दिसून आली.
गावकरी हे आपल्या छोट्या मासेमारी होड्या घेऊन नारळ मिळविण्याचा प्रयत्न करीत होते. यामुळे नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने धरमतर पुलावर जत्राच भरल्याचे चित्र दिसून आले होते.
अशातच काही गावकरी आणि चिमुरड्यांनी आगरी - कोळी वेशातील साड्या नेसून वाजतगाजत आणि नाचत येऊन समुद्राला नारळ अर्पण केला. दरम्यान, कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता.
तर धरमतर जवळच्या जुन्या पुलावर गावकऱ्यांना जाण्यास बंदी करण्यात आल्याने गावकऱ्यांनी पुलाच्या खाली जाऊन समुद्राला नारळ अर्पण केले.