मुंबईत बाळासाहेब ठाकरेंचं आंतरराष्ट्रीय स्मारक; पहिल्या टप्प्यात 181 कोटींचं काम पूर्ण, पाहा PHOTOS
शिवसेना पक्षप्रमुख दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. सदर प्रकल्पातील टप्पा 1 च्या कामासाठी मे. टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड या कंत्राटदाराची तसेच मे. आभा नरेन लांबा असोसिएट्स या सल्लागाराची नेमणूक करण्यात आली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया टप्प्यात महापौर निवासस्थान इमारतीच्या सांस्कृतिक ठेव्याचे जतन करून त्याचे संग्रहालयात रुपांतरीत करण्यात आले आहे. याशिवाय, प्रवेशव्दार इमारत, प्रशासकीय इमारत, आणि इंटरप्रिटेशन सेंटरचे बांधकामही पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाच्या टप्पा-1 च्या कामाची एकूण किंमत ₹181 कोटी इतकी आहे.
टप्पा 1 अंतर्गत महापौर निवासस्थान इमारतीचे नूतनीकरण आणि सांस्कृतिक ठेव्याचे जतन करण्यात आले आहे. इमारतीचे अंतर्गत व बाह्य भागातील स्थापत्य आणि विद्युत कामे पूर्ण करून, इमारतीला गतवैभव प्राप्त करण्यासाठी सौंदर्यीकरण करण्यात आले आहे.
या प्रकल्पाच्या टप्पा-1 अंर्तगत एक इंटरप्रिटेशन सेंटर देखील बांधण्यात आले आहे, ज्याचे क्षेत्रफळ अंदाजे 1530.44 चौ. मी. आहे. हे सेंटर भूमिगत स्वरूपात असून, तळघरात कलाकार दालन, संग्राहालय, ग्रंथालय या दालनांचा तसेच प्रसाधनगृह आणि देखभाल कक्ष यांचा समावेश आहे.
प्रवेशव्दार इमारतीचे क्षेत्रफळ अंदाजे 3099.84 चौ. मी. आहे, ज्यात बहुउद्देशीय सभागृह, सुरक्षा नियंत्रण कक्ष, भूमिगत वाहनतळ (27 वाहने) आणि वाहनांसाठी दोन स्वतंत्र उद्वाहकांचा समावेश आहे.
तसेच, प्रशासकीय इमारत 639.70 चौ.मी. क्षेत्रफळाची असून, यामध्ये उपहारगृह, कलाकार दालन कक्ष, प्रसाधनगृह आणि न्यासाचे अध्यक्ष व सचिव कार्यालये यांचा समावेश आहे. इमारतीचे छत आधुनिक मंगलौरी कौल पद्धतीने बांधण्यात आले आहे.
महापौर निवासस्थान आणि इतर संबंधित इमारतींव्यतिरिक्त, 3.00 एकर जागेत बागबगीचा तयार करून परिसराचे सुशोभिकरण करण्याचे कामे करण्यात आली असून, या कार्यामुळे संपूर्ण परिसर सुंदर आणि आकर्षक झाला आहे.
दरम्यान, टप्पा 2 मध्ये भविष्यकाळातील तंत्रज्ञानाचा वापर करुन, महापौर निवासस्थान इमारतीत मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनपटाचे प्रदर्शन करणारी विविध छायाचित्रे, दृष्यचित्रे, आणि त्यांचा राजकीय प्रवास दर्शवणारी माहिती प्रदर्शित केली जाईल.