दुबईमधून लोकांना मतदानासाठी बोलावलं जातंय, मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा दावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नाशिकमध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्यासाठी सभा घेतली. लोकांमध्ये असलेला उत्साह, त्यांचे उल्हासित चेहरे तसेच त्यांनी महायुतीच्या विजयासाठी दिलेल्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी म्हटलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिकमधील हे चित्र पाहून गेल्या दोन वर्षात राज्य शासनाने केलेली काम आणि गेल्या १० वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामांच्या जोरावर महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे हे पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने विजयी होतील असा ठाम विश्वास याप्रसंगी व्यक्त केला.
सध्या काही जण इथे प्रचार करत फिरत आहेत. मात्र नुसतं फेसबुक लाईव्ह करून आणि दुसऱ्यांना शिव्या शाप देऊन काही होते का?... त्यासाठी प्रत्यक्ष लोकांमध्ये मिसळून, त्यांच्या समस्या जाणून काम करावे लागते, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका केली.
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीला ते सोबत घेऊन प्रचार करत आहेत. त्यांच्या निवडणूक रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे झळकवले आहेत. त्यामुळे अशा प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मतदान करा, असे आवाहनही शिंदेंनी केले.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे दुबईमधून लोकांना मतदानासाठी बोलावले जात आहे. त्यामुळे डोळ्यात तेल घालून काम करा आणि जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करून महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना बहुमताने विजयी करत मोदीजींचे हात भक्कम करावे असे आवाहन शिंदेंनी केले.
नाशिकमध्ये 20 मे रोजी मतदान होत असून महायुतीकडून हेमंत गोडसे उमेदवार आहेत. तर, महाविकास आघाडीकडून राजाभाऊ वारजे हे उमेदवार आहेत. त्यामुळे, दोघांमध्येच अंतिम लढत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज नाशिकमध्य रोड शो केला. यावेळी, शिवसेना पक्षाचे जिल्ह्यातील नेते व पदाधिकारी यांसह कार्यकर्तेही मोठ्या संख्येने हजर होते.
दरम्यान, 20 मे रोजी होत असलेल्या अंतिम टप्प्यातील निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांसह महायुतीच्या नेत्यांनी कंबर कसली असून ते प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत.