Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी विधानपरिषदेत मांडला टीम इंडियाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव; अंबादास दानवे म्हणाले, पैसे न वाटता, फेरफार न करता...

भारतीय संघाने 12 वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपदाचा दुष्काळ अखेर संपविला. काल (9 मार्च) झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा चार विकेट्सने पराभव करत भारताने तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
रोहित शर्माच्या नेतृत्वात नऊ महिन्यांत भारताचे हे दुसरे आयसीसी जेतेपद आहे. 29 जून 2024 ला भारतीय संघाने आयसीसी टी-20 विश्वचषक जिंकला होता.

दुबई येथे पार पडलेल्या क्रिकेट स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने विजय प्राप्त केला म्हणून आज विधानपरिषदेच्या सभागृहात अभिनंदन प्रस्ताव मांडण्यात आला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. यावेळी भारतीयासाठी आनंदाचा क्षण आहे. 12 वर्षानंतर आपल्याला यश मिळाल आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
दुबईत चॅम्पियन्स ट्रॉफी जेतेपद जिंकल्यामुळे हे सभागृहाकडून संपूर्ण भारतीय संघाचं अभिनंदन...असं एकनाथ शिंदे म्हणाले.
भारतीय संघाचं अभिनंदन, टीम म्हणून काम केलं की दैदीप्यमान यश मिळतं, आम्हीही विधानसभा निवडणुकीत टीम म्हणून काम केलं आणि लँडस्लाईड विजय मिळवला, असं एकनाथ शिंदेंनी सांगितले.
एकनाथ शिंदेंच्या या विधानावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी देखील जोरदार बँटिंग केली.
टीम इंडिया ज्या पद्धतीने खेळली ते अभिमानास्पद आहे, EVM मॅनेज न करता, पैसे न वाटता, फेरफार न करता सर्व सामने जिंकले, असं अंबादास दानवे म्हणाले.
सर्व खेळाडूंना विधानभवनात बोलावून सत्कार करा, राज्याची आर्थिक स्थिती चांगली असेल, तर पुन्हा 1-1 कोटीचं बक्षीस जाहीर करा, अशी मागणी देखील अंबादास दानवे यांनी सभागृहात केली.